‘पतित पावन संघटने’च्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरुद्ध पुणे येथे निदर्शने !
राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद
पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असे म्हणाले होते, तसेच नितीन गडकरी आणि शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. त्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. त्याचाच निषेध म्हणून २० नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता लालमहल येथे ‘पतित पावन संघटने’च्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या वेळी ‘राज्यपाल हटाव महाराष्ट्राची अस्मिता बचाव’ अशा घोषणा देऊन केंद्र आणि राज्य सरकार यांकडे महाराष्ट्राची अस्मिता जपणारे राज्यपाल मिळावेत, अशी मागणी करण्यात आली, असे पतित पावन संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख स्वप्नील नाईक यांनी सांगितले. या वेळी संघटनेचे सर्वश्री शिवाजीराव चव्हाण, धनंजय क्षीरसागर, दिनेश भिलारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.