‘म. गांधींच्या हत्येसाठी पिस्तूल देणार्या काँग्रेसच्या नेत्याचा शोध घ्या !
रणजित सावरकर यांचे तुषार गांधी यांना आवाहन !
मुंबई – म. गांधी यांच्या हत्येसाठी वापरलेल्या पिस्तुलाचे पोलिसांनी जाणीवपूर्वक योग्य अन्वेषण केले नाही, असे या खटल्यातील अधिवक्ता पु.ल. इनामदार यांनी त्यांच्या ‘लाल किल्ल्यातील अभियोगाची कहाणी’ पुस्तकात लिहिले आहे. म. गांधी यांच्या हत्येशी संबंधित सर्व कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊ शकते.
म. गांधींच्या हत्येसाठी पिस्तूल देणारा काँग्रेस नेता नेमका कोण ?, यावर गांधीजींच्या पणतूंनी (तुषार गांधी यांनी) स्वतः अधिक अभ्यास केला पाहिजे, असे आवाहन रणजित सावरकर यांनी दैनिक ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहे. काही दिवसांपूर्वीच तुषार गांधी यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नथुराम गोडसे यांना गांधी यांची हत्या करण्यासाठी पिस्तूल दिले होते’, असा दावा केला होता. त्यावर रणजित सावरकर यांनी वरील आवाहन केले आहे.
रणजित सावरकरांचा खळबळजनक दावा: महात्मा गांधींच्या हत्येसाठी काँग्रेस नेत्यानेच पिस्तूल दिले, म्हणूनच सावरकर निर्दोष सुटले#MahatmaGandhi #savarkar @RanjitSavarkar https://t.co/lbgEKBZJHf pic.twitter.com/9tdvIbmOhe
— Divya Marathi (@MarathiDivya) November 23, 2022
मुलाखतीमध्ये रणजित सावरकर यांनी मांडलेली सूत्रे
१. गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले ग्वाल्हेरचे डॉ. परचुरे यांनी जगदीश गोयल या शस्त्र व्यापार्याकडून पिस्तूल विकत घेऊन नथुराम गोडसे यांना दिले, असा त्यांच्यावर आरोप होता. गोयल यांच्या साक्षीवरून नथीलाल जैन याला अटक करण्यात आली. नथीलाल हा काँग्रेसच्या एका मंत्र्यांचा मेहुणा होता. त्या वेळी पोलिसांनी आरोपींच्या अधिवक्त्यांना दिलेल्या माहितीत नथीलाल जैन आणि ग्वाल्हेरचे तत्कालीन काँग्रेस गृहमंत्री यांची नावे होती. या दोघांनाही लाल किल्ल्यात आणून ठेवले होते; मात्र या दोघांना कधीच न्यायालयात उपस्थित करण्यात आले नाही. अशा प्रकारे गांधी यांच्या हत्येचे धागेदोरे काँग्रेस नेत्याशी जोडले जात असतांना पोलिसांनी नथीलाल जैन याचा कोणताही जबाब नोंदवला नाही.
२. तुषार गांधी अनेक वर्षांपासून वीर सावरकर यांच्यावर कोणत्याही पुराव्याविना खोटे आरोप करत आहेत. पोलिसांचे सातत्याने सावरकर यांच्यावर लक्ष होते. त्यामुळे ‘नथुराम गोडसे यांनी म. गांधी यांच्या हत्येच्या २ दिवस आधी सावरकर यांची भेट घेतली आणि सावरकर यांनी गोडसे यांना बंदूक दिली’, हा आरोप म्हणजे खोटेपणाची परिसीमा आहे.
३. ‘गांधीजींच्या हत्येमध्ये सावरकर यांचे नाव समाविष्ट करणे’, ही काँग्रेसची राजकीय खेळी होती. गांधी यांच्या हत्येमध्ये वीर सावरकर यांना अडकवून नेहरू यांनी हिंदु महासभा संपवली. सत्र न्यायालयाने वीर सावरकर यांची निर्दोष मुक्तता केली.
४. न्यायालयाने सावरकर यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे सावरकर यांच्याविरुद्ध सरकारकडूनही अपील करण्यात आले नाही. नेहरू यांच्या कार्यकाळात जे घडले, ते आजही घडत आहे. राजकीय लाभासाठी सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत.
महापुरुषांवर आरोप होऊ नयेत, यासाठी सरकारने कायदा करावा !
राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर आरोप केल्यावर तुषार गांधी पुन्हा आरोप करत आहेत. या दोघांना आम्ही उत्तर दिले. ६ मासांनंतर हे लोक पुन्हा काही आरोप करतील. त्यामुळे महापुरुषांविषयी असे वाद होऊ नयेत, यासाठी सरकारने स्वतः कायदा करावा. कुणी महापुरुषांवर खोटे आरोप केले, तर त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवून शिक्षा झाली पाहिजे, असे मत रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.
हिंदूंनी संघटित झाले पाहिजे !
हिंदु समाज संघटित झाला पाहिजे, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मुख्य उद्दिष्ट होते. जोपर्यंत हिंदु समाज बहुसंख्य आहे, तोपर्यंत भारतात धार्मिक स्वातंत्र्य असेल. पाकिस्तान आणि बांगलादेश भारतापासून तुटून वेगळे देश झाले अन् तेथे हिंदूंनी संख्या नाममात्र उरली आहे. तेथे धार्मिक स्वातंत्र्य नाही. हे दोन्ही देश इस्लामीकरणाकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे भारतातील हिंदु समाजाने संघटित होऊन राहिले पाहिजे, असे आवाहन रणजित सावरकर यांनी केले.