वाराणसी येथील आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना आलेल्या अनुभूती
१. ध्यानमंदिरातील श्री अनंतानंद साईश यांच्या छायाचित्राकडे पाहून आलेल्या अनुभूती
१ अ. ‘श्री अनंतानंद साईश यांच्या छायाचित्राकडे पहात नामजप करावा’, असे वाटणे : ‘दोन दिवसांपूर्वी मी वाराणसी येथील आश्रमातील ध्यानमंदिरात नामस्मरण करत बसले होते. त्या वेळी माझे लक्ष प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश यांच्या छायाचित्राकडे गेले. ‘त्यांच्या छायाचित्राकडे पहात नामजप करावा’, असे मला वाटले.
१ आ. श्री अनंतानंद साईश यांचे छायाचित्र पुष्कळ तेजस्वी वाटणे आणि त्यातून पुष्कळ प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : त्या वेळी माझ्या मनात ‘मला प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारखे सतत भावावस्थेत रहाता येत नाही. मी पुष्कळ अल्प पडते’, असा विचार आला. मला आज ध्यानमंदिरात असलेल्या गुरुपरंपरेतील (श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद महाराज, श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज, प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य डॉ. जयंत बाळाजी आठवले, ही सनातनची गुरुपरंपरा आहे.) इतर छायाचित्रांपेक्षा श्री अनंतानंद साईश यांचे छायाचित्र अधिक तेजस्वी वाटत होते. ‘त्या छायाचित्रातून पुष्कळ तेजस्वी प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.
१ इ. छायाचित्रातील श्री अनंतानंद साईश यांच्या डोळ्यांची हालचाल होत असल्याचे जाणवणे : श्री अनंतानंद साईश यांच्या छायाचित्राकडे पाहून मी नामजप करू लागले. तेव्हा मला त्यांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवला. मला त्यांच्या डोळ्यांची हालचाल होत असल्याचे जाणवले. यापूर्वी मला त्यांच्या छायाचित्राविषयी असे कधी जाणवले नव्हते.
१ ई. छायाचित्राकडे पहातांना नामजप एका लयीत चालू होऊन शरीर हलके होत जाणे आणि मन निर्विचार होणे : ‘श्री अनंतानंद साईश यांच्या छायाचित्राकडे पहातच रहावे’, असे मला वाटत होते. त्यांच्या तोंडवळ्याकडे बघत माझा नामजप आतून चालू झाला. त्या वेळी माझा नामजप एका लयीत चालू झाला. माझे शरीर हलके होत गेले आणि मन निर्विचार झाले.
१ उ. मला श्री अनंतानंद साईश यांच्या छायाचित्राच्या कडेला पिवळसर पांढरा प्रकाश आणि चैतन्याची प्रभावळ दिसली.
१ ऊ. श्री अनंतानंद साईश यांच्या छायाचित्रात त्यांच्यासह प.पू. दास महाराज यांचा तोंडवळा दिसणे : मला श्री अनंतानंद साईश यांच्या छायाचित्रात कधी श्री अनंतानंद साईश यांचा, तर कधी प.पू. दास महाराज यांचा तोंडवळा दिसत होता. तेव्हा ‘मी प.पू. दासमहाराज यांच्या समोर नामजप करत बसले आहे’, असे मला दोन वेळा जाणवले.
२. ध्यानमंदिरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना
२ अ. ध्यानमंदिरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातील त्यांचे मुख मला तेजस्वी आणि गुलाबाच्या फुलाप्रमाणे दिसत होते.
२ आ. त्यांचा सदरा गुलाबी रंगाचा आणि पारदर्शक दिसत होता.
२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राच्या कडा कधी पिवळसर चैतन्यमय दिसल्या, तर कधी तेथे निळी प्रभावळ असल्याचे दिसले.
२ ई. शरीर हलके होऊन मन आनंदी आणि उत्साही होणे अन् नामजप एकाग्रतेने होऊन आनंदावस्था अनुभवता येणे : हे सर्व अवर्णनीय होते. त्या वेळी ‘तेथून हलूच नये’, असे मला वाटत होते. माझे शरीर हलके होऊन मन आनंदी आणि उत्साही झाले. नंतर माझे मन निर्विचार होऊन माझा नामजप एकाग्रतेने होत होता. मला ‘नामजप करतच रहावे’, असे वाटत होते आणि मला आनंदावस्था अनुभवता आली.
३. ध्यानमंदिरात गेल्यावर थंडावा जाणवणे आणि मनाला आल्हाददायक अन् उभारी देणारी ऊर्जा मिळणे : मी ध्यानमंदिरातील देवतांच्या चित्रांना नमस्कार करत होते. तेव्हा मला थंडावा जाणवला. ध्यानमंदिरातील शांततेमुळे माझ्या मनाला आल्हाददायक आणि साधनेला उभारी देणारी ऊर्जा मिळाली. ध्यानमंदिरात गेल्यावर ‘मी निर्वात पोकळीत गेले आहे’, असे मला जाणवले.
४. श्री दुर्गादेवीच्या मूर्तीकडे पाहून नामजप करतांना
४ अ. श्री दुर्गादेवीमध्ये कालीमाता आणि लक्ष्मीमाता यांचे दर्शन होणे : ध्यानमंदिरात श्री दुर्गादेवीची पितळ्याची मूर्ती आहे. तिच्याकडे पहात नामस्मरण करतांना कधी मला तिच्यात उग्ररूपातील कालीमातेचे दर्शन झाले, तर कधी कमळावर उभी असलेली श्री लक्ष्मीमाता दिसली.
४ आ. काही वेळ मला तिच्याभोवती चैतन्याची प्रभावळ दिसली.
४ इ. काही वेळानंतर मला ‘देवी युद्धाला सिद्ध झाली आहे आणि तिच्या एका बाजूला एक राक्षस असून दुसरा राक्षस तिच्यावर आक्रमण करण्यासाठी धावत आहे’, असे जाणवले.
४ ई. श्री दुर्गादेवीत वात्सल्यभाव जाणवून आनंद आणि उत्साह वाटणे : साधक डोळे मिटून नामजप करत असतांना ‘देवी मान हालवून सर्वांकडे पहात आहे आणि तिचे सर्वांवर लक्ष आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला तिच्या डोळ्यांत वात्सल्यभाव जाणवला. तेव्हा ‘श्री दुर्गादेवी मनाला पुष्कळ आनंद आणि उत्साह देणारी अन् सर्वांकडून नामजप करवून घेणारी ‘जगन्माताच’ आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. हे सारेच अवर्णनीय आहे. ‘तिचे लक्ष येणार्या-जाणार्या सर्वांवर असते,’ असे वाटले.’
– श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे), वाराणसी आश्रम (४.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |