पालकांनो, मुलीचा आत्मसन्मान जपा !
श्रद्धा वालकर हिच्या हत्येप्रकरणी माझे मत !
१. घरातील प्रतिकूल वातावरणामुळे मुलांचे भावनिक विश्व कोलमडून ती चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता असणे
‘श्रद्धा वालकर हिच्या कुटुंबातील नात्यांमध्ये बर्याच समस्या होत्या. तिचे आई-वडील वेगळे रहात होते. अशा कुटुंबातील मुलांवर घरातील प्रतिकूल वातावरणाचा सखोल परिणाम होतो. आई विविध शारीरिक किंवा भावनिक अत्याचारांना सामोरी जात आहे, हे बघणार्या मुलांचे भावनिक विश्व कोलमडून जाते. यावर वेळीच उपचार न केल्यास मुलांचे व्यक्तीमत्त्व कायमचे झाकोळून जाते. अशी मुले चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात, तसेच आदर न ठेवणार्या नात्यात अडकण्याची त्यांची शक्यताही अधिक वाढते. (मानसिक स्तरावरील हा भाग असा असला, तरी मुलांना लहानपणापासूनच धर्मशिक्षणाचे धडे दिल्यास ती प्रतिकूल स्थितीत खचून न जाता आहे त्या परिस्थितीला सामोरी जातात. – संकलक)
२. घरच्यांनी मुलीशी असलेले नाते तोडून टाकणे हा अपरिपक्वपणा असणे
जोडीदाराचा मार खात श्रद्धा त्याच्या समवेतच रहात होती; ‘कारण माझी हीच शिक्षा किंवा लायकी आहे’, असे तिचे घायाळ झालेले आणि दुखावलेले अंतर्मन तिला सांगत होते. घरच्यांनी तोडलेल्या नात्यामुळे ही समजूत तिच्यात अजून मुरली असावी. एकदा आत्मसन्मान गमावला की, त्या व्यक्तीवर अत्याचार करणे समोरच्याला सोपे जाते. त्याचा लाभ तिच्या जोडीदाराने पुरेपूर घेतला. घरातील लोकांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले, हीसुद्धा सर्वांत मोठी चूक होती. तो अपरिपक्वपणाचा भाग होता. बाकीच्या गोष्टींपेक्षा अशा घरातील मुलांना पुरेसा मानसिक आधार आणि समुपदेशन वेळीच मिळेल, यादृष्टीने समाजात जागरूकता निर्माण व्हायला हवी.
३. खरे पालकत्व म्हणजे काय ?
आपल्या मुलींना कणखर, स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाचे बनवणे, माणसांची पारख करायला शिकवणे आणि तरीही काही समस्या आलीच, तर तिच्या पाठीशी खंबीर उभे राहणे, हे खरे पालकत्व !
– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्वतज्ञ, कोथरूड, पुणे.