साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना त्यांच्या अंतर्मनात प्रेमभावाचे बीज रुजवणार्या फोंडा, गोवा येथील पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७३) वर्षे !
‘सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक या साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्या आढाव्यातील फोंडा येथील सौ. शकुंतला जोशी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७१ वर्षे) यांना पू. सुमनमावशी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. साधनेचा आढावा घेतांना ‘प्रत्येक शब्दागणिक साधकांमध्ये प्रेमभाव वृद्धींगत व्हावा’, यांसाठी प्रयत्न करणार्या पू. सुमन नाईक !
‘पू. सुमनमावशी साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना प्रत्येक शब्दागणिक त्यांचा प्रेमभाव व्यक्त होतो. त्यामुळे आम्हा साधकांचाही प्रेमभाव बिंब-प्रतिबिंब या न्यायाने काही प्रमाणात उत्स्फूर्तपणे व्यक्त होतो. पू. सुमनमावशी ‘साधकांमध्ये प्रेमभाव वृद्धींगत व्हावा’, यासाठी प्रयत्न करतात. आई मुलाला निःस्वार्थ बुद्धीने शिकवते, तसे त्या आम्हाला प्रेमाने शिकवतात.
२. पू. सुमन मावशी यांच्या शिकवणीमुळे इतरांविषयी कृतज्ञताभावात बोलल्यावर भावजागृती होऊन साधकांना आढाव्यातील आनंद अनुभवता येणे
‘समोरच्या व्यक्तीशी बोलतांना आपल्या अंतर्मनातील प्रेम कसे व्यक्त करू शकतो ?’, याची जाणीव त्या आईच्या ममतेने करून देतात. ‘मृदू आणि प्रेमळ बोलण्याने पाषाणालाही पाझर फुटू शकतो, तसेच आपण आपल्या प्रेमळ बोलण्याने घर आणि समाज यांमधील व्यक्तींना जिंकू शकतो.’ यांसाठी त्या आम्हा साधकांकडून प्रात्यक्षिक करून घेतात. त्यांच्या या शिकवणीमुळे इतरांविषयी कृतज्ञताभावात बोलल्यावर आम्हा साधकांची आपोआप भावजागृती होते आणि आम्हाला आढाव्यातील आनंद अनुभवता येतो.
३. ‘सकारात्मक राहिल्यामुळे आनंदाचा लाभ घेऊ शकतो’, ही जाणीव अंतर्मनावर बिंबवणे
आढाव्यात बोलतांना साधकांकडून एखादा नकारात्मक शब्द उच्चारला गेल्यास तो शब्द अचूक हेरून त्या ‘सकारात्मक कसे रहायचे ?’, याविषयी मार्गदर्शन करतात. त्या आढाव्यातील इतर साधकांनाही यावर चिंतन करायला सांगून प्रोत्साहन देतात. ‘प्रत्येक प्रसंगात सखोल चिंतन करून येणार्या समस्यांवर कशी मात करू शकतो’, याविषयी त्या आम्हाला जाणीव करून देतात. ‘सकारात्मक राहिल्यामुळे आनंदाचा लाभ घेऊ शकतो’, ही जाणीव अंतर्मनावर बिंबवतात.
४. साधकांना स्वतःच्या चुकांविषयी सतर्क करणे
काही वेळा आम्हाला आमच्या चुका लक्षात येत नाहीत. त्यांना त्या चुका आमच्या लक्षात आणून द्याव्या लागतात. त्या संदर्भात पू. मावशी सदैव सतर्क असतात. ‘चूक कोणत्या स्वभावदोषांमुळे झाली ?’, याविषयी चिंतन करायला सांगून आमच्या स्वभावदोषांची तत्त्वनिष्ठपणे जाणीव करून देतात आणि प्रायश्चित्त घेण्यासाठी उद्युक्त करतात.
५. आढाव्यातील प्रत्येक साधकाला सहभागी करून घेऊन प्रेरित करणे
पू. मावशी आढाव्यातील प्रत्येक साधकाला सहभागी करून घेऊन ‘प्रत्येक प्रसंगात योग्य कृती कोणती ?’, याविषयी चिंतन करायला सांगतात. प्रत्येकाचे विचार जाणून घेऊन त्याला मार्गदर्शन करतात. त्यामुळे साधकांच्या विचारांना चालना मिळून त्यांना शिकायला मिळते.
६. प्रार्थना
‘हे गुरुमाऊली, ज्या संतांच्या अंतरंगात अनेक बहुमोल गुणांचा खजिना काठोकाठ भरलेला आहे’, अशा संतांच्या चरणी साधनेचा आढावा अर्पण करण्याची संधी देऊन आपण आम्हाला आत्मनिवेदन भक्तीरसात डुंबून जाण्यासाठी साहाय्य करत आहात. ‘आपणच आम्हाला आपल्या चरणी समर्पित होण्यासाठी अनेक माध्यमांतून मार्गदर्शन करत आहात’, याची जाणीव क्षणोक्षणी आमच्या अंतरंगात जागृत ठेवा’, अशी आपल्या पावन चरणी उत्कट प्रार्थना !’
– सौ . शकुंतला जोशी (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७२ वर्षे) फोंडा, गोवा. (१३.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |