महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्याच्या समन्वयासाठी राज्यशासनाकडून २ मंत्री नियुक्त !
मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्याच्या न्यायालयीन समन्वयासाठी महाराष्ट्र सरकारकडून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २१ नोव्हेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्याविषयी स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकारी समितीची बैठक झाली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह समितीचे सदस्य, महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
सीमाप्रश्नाविषयी लवकरच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेऊ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
कर्नाटक-महाराष्ट्र भागातील मराठी भाषिक बांधवांच्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे नेहमीच राहिलेले आहेत. राज्यशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालत आहे. यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन् यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास विधीज्ञांची संख्या वाढवण्यात येईल. याविषयी मी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आम्ही पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांची लवकरच भेट घेऊ. सीमाप्रश्न हा विषय हाताळणार्या विशेष कक्षाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.