पालकांनी मुलांचे लसीकरण करून घ्यावे ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री
मुंबई – गोवरच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. येत्या काही दिवसांतच व्यापक सर्वेक्षण आणि लसीकरण यांच्या माध्यमातून गोवर संसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात येईल. पालकांनी मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले.
शहरातील गोवरच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येविषयी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी कस्तुरबा रुग्णालयात भेट देऊन आरोग्यसेवेची माहिती घेतली. मंत्रालयातही आरोग्यमंत्र्यांनी गोवरच्या संसर्गाचा आढावा घेतला. या वेळी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना डॉ. तानाजी सावंत म्हणाले, ‘‘मुंबई शहरातील ठराविक प्रभागांतच गोवरचा संसर्ग आहे. या प्रभागांत सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयित लक्षणे असणार्या बालकांना चिकित्सालयात ठेवण्यात येत आहे. लसीकरणासाठी नियमित १४० आणि अतिरिक्त १५० सत्रे आयोजित केली जात आहेत. लसीकरण करून घेतले जावे, यासाठी समुपदेशन केले जात आहे. येत्या काळात गोवरचा संसर्ग असलेल्या प्रभागात अतिरिक्त पथकांद्वारे लसीकरण केले जाणार आहे.’’