निसर्गदत्त सौंदर्य स्वीकारा आणि सौंदर्यप्रसाधनांचा अतिरेक टाळा !
१. उत्पादने खपवण्यासाठी आस्थापनांनी भोळ्याभाबड्या भारतियांना मूर्ख बनवणे
‘असे म्हणतात की, माणूस २१ व्या शतकात पोचला असून त्याने पुष्कळ प्रगती केली आहे. चंद्र जुना झाला ! आता तर त्याने मंगळावर पाऊल ठेवले आहे. समजा, पर्यावरणाचा नाश करून आपण पृथ्वीचा विनाश घडवून आणला, तर त्यानंतर मंगळाचा नाश कसा करता येईल, यावर संशोधन चालू आहे इत्यादी. इतक्या सगळ्या विकासात, प्रगतीमध्ये आणि परिवर्तनात एक गोष्ट मात्र अगदी ठामपणे टिकून आहे अन् ती म्हणजे ‘गोरी बायको हवी !’ सध्या शहरातील मुली याला महत्त्व देत नाहीत; पण ‘खेड्यात मात्र चांगला नवरा मिळवायचा असेल, तर किमान रंग तरी गोरा हवा’, हा अपसमज बाकी आहे. यच्चयावत् भारतीय लोकांच्या विचारांवर प्रभावीपणे नियंत्रण करणारी विज्ञापने गोर्या रंगाला अवास्तव महत्त्व देतात. ‘चांगला नवराच काय, चांगली नोकरी, चांगले मित्रमैत्रिणी, नोकरीत बढती, अभिनयातील पुरस्कार, तोंडी परीक्षेत चांगले गुण, मुलांचे प्रेम, आत्मविश्वास, व्यावसायिक यश हे सर्व गोरा रंग असेल, तरच मिळते’, असा एक मठ्ठ संस्कार त्यांनी समाजमनावर केला आहे. त्यांच्या उत्पादनांचा खप होण्यासाठी असे मूर्ख बनवणे आवश्यक आहे; पण भोळीभाबडी भारतीय जनता मूर्ख बनते, हे धोकादायक आहे.
२. त्वचेच्या सौंदर्याचे रक्षण करणार्या ‘मेलॅनिन’ या तत्त्वाची उपयुक्तता लक्षात घ्या !
संपूर्ण पृथ्वीवरील सगळ्या माणसांचे रंग सारखे नाहीत. गोरा, सावळा, काळा, पिवळा (चिनी लोकांचा) असे अनेक वैविध्य रंगांमध्ये आहे. ‘मेलॅनिन’ (Melanin) या त्वचेतील तत्त्वामुळे तिला हा रंग मिळतो. आपली त्वचा ही स्वतःची सगळ्यात मोठी संरक्षक संस्था आहे. यात काही विशिष्ट पेशी असतात. त्या हे तत्त्व बनवतात. सर्व माणसांमध्ये ‘मेलॅनिन’ बनवणार्या पेशींची संख्या समान असते; पण उष्ण प्रदेशात प्रखर उन्हापासून रक्षण करण्यासाठी या पेशी अधिक प्रमाणात ‘मेलॅनिन’ बनवतात. त्याच थंड प्रदेशात अल्प पेशी बनवतात; कारण ‘मेलॅनिन’ हे आपल्या शरिरातील नैसर्गिक ‘सनस्क्रीन’ आहे. बाजारातील कुठलेही सनस्क्रीन याच्याइतके प्रभावी आणि निरुपद्रवी नाही. घातक अशा अतीनील (अल्ट्राव्हायलेट) किरणांपासून ‘मेलॅनिन’ हे आपल्या शरिराचे रक्षण तर करतेच, तसेच त्वचेचा कर्करोग आणि विषाणूजन्य आजार यांच्या प्रतिकारासाठी शरिराला संरक्षककवचही प्रदान करते. आपली रोगप्रतिकारक्षमता टिकवून ठेवते. शरिरातील ‘फॉलिक ॲसिड’ उन्हात जाळू देत नाही. ‘ड’ जीवनसत्त्व बनवायला साहाय्य करते. स्वेदग्रंथींवर नियंत्रण ठेवून तापमान आणि शरिरातील पाणी संतुलित राखायला साहाय्य करते.
३. जगातील अतीश्रीमंत आस्थापनांनी पैसा मिळवण्यासाठी सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय करणे
आता सांगा, बाजारातील ‘फेअरनेस क्रीम’ आपल्याला कसे गोरे करणार ? ‘मेलॅनिन’ बनवणार्या पेशींना मारून कि त्यांना अल्प ‘मेलॅनिन’ बनवायला शिकवून ? कि बनलेले ‘मेलॅनिन’ धुऊन टाकून ? ही कामे शरिराच्या इच्छेविरुद्ध करणे कुणालाच शक्य नाही. समजा केली, तरी ती आपल्यालाच धोकादायक नाहीत का ? ‘मेलॅनिन’ची ही वर सांगितलेली आवश्यक कामे कोण करणार ? ती फडतूस क्रीम ? आपण त्या विज्ञापनांना भुलतो. जगातील अतीश्रीमंत आस्थापने अधिक श्रीमंत होण्यासाठी या व्यवसायात उतरल्या आहेत. त्यांच्यासाठी भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. (संपूर्ण युरोप-अमेरिकेत जेवढे ग्राहक मिळणार नाहीत, तेवढे ग्राहक केवळ भारतात मिळू शकतात. चीनची लोकसंख्या आपल्यापेक्षा अधिक आहे; पण भारतात पैसे मिळवण्याचे आणि ते मनासारखे व्यय करण्याचे जे स्वातंत्र्य आहे, म्हणजे ज्याचे भारतियांना काडीचे मूल्य नाही, ते चीनमध्ये नाही. त्यामुळे चीन ही पाश्चात्त्य लोकांसाठी कधीच उत्तम बाजारपेठ नाही.)
विज्ञापनांच्या माध्यमातून ही आस्थापने आपल्या युवा पिढीच्या मनात रंगाविषयी न्यूनगंड निर्माण करतात. त्यांच्या उत्पादनांविषयी विश्वास निर्माण करतात आणि ‘तुमचा रंग पालटल्यावर चित्रपटातील कलाकारांप्रमाणे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता’, असे गाजर दाखवतात. आज या एकाच व्यवसायात कित्येक अब्जावधी डॉलर्सची उलाढाल चालू आहे. प्रतिवर्षी यात १८ टक्क्यांनी वाढ होते. प्रतिवर्षी इतका पैसा आपण स्वखुशीने आणि निष्काळजीपणे विदेशात पाठवतो.
४. सौंदर्यप्रसाधनांमुळे मानवी त्वचेच्या नैसर्गिक सौंदर्याची हानी होणे
पाश्चात्त्य लोक जे करतात, ते प्रामाणिकपणे विज्ञानाला धरून आणि काटेकोर संशोधन करून असते, हा आपला आणखी एक भाबडा अपसमज ! त्यामुळे ‘त्यांनी सिद्ध केलेली सौंदर्यप्रसाधने उत्तम असतात’, असे प्रमाणपत्र आपणच त्यांना मनातल्या मनात देऊन टाकतो; पण वस्तूस्थिती अशी आहे की, सौंदर्यप्रसाधने, त्यातील रासायनिक घटक, त्यांचे त्वचेवर होणारे परिणाम किंवा दुष्परिणाम यांच्यावर विशेष संशोधन झालेले नाही. ही प्रसाधने अन्न किंवा औषध या दोन्ही गटांत बसत नसल्याने त्यांच्यासाठी कुठलेही कडक नियम बनवलेले नाहीत. बनवणारे लोक व्यापारी वृत्तीने नियम बनवतात आणि आपण आंधळेपणे ती वापरतो. या क्रीम वापरून आपण काय मिळवतो ? बर्याच क्रीममध्ये असलेल्या ‘ब्लीच’मुळे तात्पुरता गोरेपणा मिळतो; पण त्या मोहात पडून वारंवार आणि प्रतिदिन त्यांचा वापर केला जातो. त्याने पुढे जाऊन काय मिळते ? आजारी त्वचा, त्वचेवरील डाग, अधिक काळा (करपलेला/भाजलेला) रंग, त्वचेचा कर्करोग, ‘ब’ आणि ‘ड’ जीवनसत्त्वांची उणीव, सूर्याच्या प्रखर किरणांचे दुष्परिणाम, रोगप्रतिकारक्षमतेची हानी इत्यादी.
५. सौंदर्यप्रसाधनांवर वारेमाप पैसा व्यय करून भारतियांनी पैसा विदेशात पाठवणे धोकादायक !
मग काय आम्ही कधी गोरे होणारच नाही ? कसे होणार ? आमचा देश आणि अनुवंशिकताच अशी आहे की, आमच्या त्वचेत गडद ‘मेलॅनिन’ सिद्ध होते, फिकट नाही. त्यावर ‘काही उपाय करून एखादी शेड पालटू शकते. विज्ञापनात दाखवतात तसा ५-५ शेडचा फरक होतो’, असा दावा करणे आणि त्यावर विश्वास ठेवणे, हे दोन्ही मूर्खपणाचे आहे. लहानपणी आपल्याला बगळा आणि कावळा यांची गोष्ट सांगितली जायची. त्यातील कावळा हा बगळ्यासारखा शुभ्र रंग मिळवण्यासाठी दगडाने स्वतःचे अंग घासून शेवटी रक्तबंबाळ होऊन मरतो. हा शेवट मात्र आपण विसरतो. आज आपण शब्दश: मरत नसलो, तरी सौंदर्यप्रसाधनांची खरेदी करून जो वारेमाप पैसा सहजपणे विदेशात पाठवतो, तेही तितकेच धोकादायक आहे. आता आपला मुळात सावळा किंवा काळा रंग अधिक तेजस्वी होऊ शकतो. त्याचा आपण आयुर्वेदाच्या पद्धतीने विचार करूया.
६. त्वचेचे सौैंदर्य वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय !
६ अ. त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी दिनचर्या आदर्श करणे आवश्यक ! : मुळात त्वचेचा निखार जाण्याची असलेली कारणे समजून घेऊन टाळता आली, तर अधिक लाभ होईल. रात्री जागरणे करणे, शिळे अन्न, ‘फास्ट फूड’, तसेच आंबट आणि खारट पदार्थांचे अतिरेकी सेवन, कोरडा आहार, तेल-तूपविरहित आहार घेणे, दिवसा झोपणे, अजिबात घाम न येणे, केसांना लावले जाणारे रासायनिक रंग, उन्हात काम करणे हे सर्व आपल्या त्वचेच्या प्राकृतिक वर्णाचे वैरी आहेत. करियरच्या किंवा अभ्यासाच्या मागे लागून तहान-भूक-झोप यांचे भान हरवलेल्या व्यक्ती किंवा तंदुरुस्ती यांच्या चुकीच्या कल्पनांपायी शरिराची चिपाडं झालेल्या व्यक्तींची त्वचा रसरशीत दिसेलच कशी ? या चुका यथेच्छ चालू ठेवून महागड्या क्रीमच्या डब्या कितीही चोपडल्या, तरी काही लाभ होणार नाही. त्यामुळे ज्यांना आपला वर्ण सुधारायचा आहे, त्यांनी आधी स्वतःची दिनचर्या सुधारावी.
६ आ. वैद्यांच्या सल्ल्याने प्राकृतिक उपाय करावेत ! : रंग सुधारण्यासाठी त्वचेला लावायला कच्चे दूध, दही, कोरफड किंवा पपई किंवा आंबा यांचा गर, टोमॅटोचा रस, दूध+लिंबू रस, शतधौत घृत, कुंकुमादि तेल असे उपाय वैद्यांच्या सल्ल्याने करावेत. (मनाने करू नयेत; कारण कुठल्या त्वचेसाठी काय लागू आहे, हे ठरवावे लागते.)
६ इ. जीवनशैलीत पालट करणे हा रामबाण उपाय ! : रात्री १० च्या आत झोपणे, सकाळी ६ वाजता उठणे, घाम गाळेपर्यंत व्यायाम करणे, उष्ण आणि ताजा आहार, आहारात देशी गायीचे दूध अन् तूप घेणे, ‘फास्ट फूड’ला रामराम ठोकणे, योगासने, प्राणायाम, अभ्यंग असे जीवनशैलीतील लहान लहान पालट केवळ आपलाच नाही, तर जीवनाचा रंगही पालटतात. त्यामुळे ते करून बघा !
७. भारतियांसाठी संदेश !
शेवटी भारतियांसाठी संदेश हाच की, जी गोष्ट निसर्गदत्त आहे, तिचा कसला आला न्यूनगंड ? अहो, आपल्या देवाचे एक रूपही सावळे आहेत. असे असले, तरी त्यांचे रूप निरतिशय देखणे, आपल्याला वश करून घेणारे आणि मन प्रसन्न करणारे असेच आहे.
– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (साभार : साप्ताहिक ‘विवेक’)