आज प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा
भोर (पुणे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !
भोर (जिल्हा पुणे), २२ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदूंना धर्मशिक्षण न मिळाल्याने ते आपली संस्कृती आणि धर्म यांपासून दूर जात आहेत. विदेशी लोक आज हिंदु संस्कृतीनुसार आचरण करत आहेत; परंतु भारतातील बहुसंख्य हिंदू धर्मपालन करण्याकडे पाठ फिरवत आहेत. परिणामी लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदु संत, देवता यांचे विविध माध्यमांतून विडंबन, गोहत्या अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. आज हिंदु स्त्रियांनी धर्मपालन करणे सोडल्याने त्यांच्यावरील अत्याचारांत वाढ झाली आहे. त्यासाठी आज प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी केले. भोर, जिल्हा पुणे येथील नेरे येथे २० नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेला पुष्कळ धर्मप्रेमींची उपस्थिती होती.
सभेचा प्रारंभ ग्रामदैवत श्री बालसिद्धेश्वराची आरती करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आला. या वेळी श्री. नागेश जोशी यांचा सत्कार तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. आनंद बढे, तर रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांचा सत्कार बचतगट प्रतिनिधी सौ. रमण सावले यांनी केला. सभेचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी केले.
विशेष
१. सभेचा प्रसार, आयोजन आणि नियोजन यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी कृतीशील होते. सर्वांनी प्रत्येक सेवा तळमळीने केली.
२. सभेच्या दिवशी सिद्धतेसाठी गावातील लहान मुलेही छोट्या सेवांमध्ये आनंदाने सहभागी होत होती. गावातील प्रत्येकाचा प्रतिसाद सकारात्मक असल्यामुळे सभेसाठी सहकार्य मिळत होते.
३. सभेनंतर धर्मप्रेमींनी वक्त्यांसमवेत धर्मावरील आघात, धर्मकार्य तसेच स्थानिक समस्या यांविषयी चर्चा केली आणि एक हिंदु म्हणून संघटित होऊन प्रत्येकाने धर्मरक्षणासाठी कृती करायला हवी, असे मनोगत व्यक्त केले.
४. सभेला महिलांचा प्रतिसाद उल्लेखनीय होता, तसेच सर्व विषय महिलांनी एकाग्रतेने ऐकला.
५. उपस्थित महिला आणि युवती यांना ‘आमच्यासाठी धर्मशिक्षण अन् स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग लवकर चालू करा’, अशी मागणी केली. अजून कुठे तुमची सभा, आंदोलन असेल, तर आम्हाला सांगा. आम्ही येऊ. ‘आम्ही आतापासून काय करू ते सांगा’, असेही त्यांनी विचारले, तसेच धर्मप्रेमी युवकांनीही ‘नक्की काय आणि कसे धर्मकार्य करायला हवे, याची दिशा मिळण्यासाठी एकत्र येऊन कार्य करूया’, असे सांगितले.
आपल्या देशातील आणि धर्मावरील समस्यांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव पर्याय ! – श्री. नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती
आजपर्यंत केवळ गुरु-शिष्य परंपरेने धर्म टिकवून ठेवला आहे. आज प्रत्येकाने धर्माचरण करणे आवश्यक आहे. धर्मावर वेगवेगळ्या माध्यमातून आक्रमण झाले. त्यातील एक म्हणजे हलाल जिहाद ! त्या माध्यमातून इस्लामी आतंकवाद्यांना साहाय्य केले जाते. आजच्या पिढीला आपल्या राष्ट्रपुरुषांऐवजी मुघल, नेपोलियन यांचा इतिहास शिकवला जातो. आज अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण केले जात आहे आणि बहुसंख्यकांना डावलले जात आहे. मंदिर सरकारीकरणाच्या नावाखाली केवळ हिंदूंच्याच मंदिरांना लक्ष्य केले जात आहे आणि आपल्या प्रथा-परंपरा पायदळी तुडवल्या जात आहेत. आपल्या देशातील आणि धर्मावरील समस्या संपवायच्या असतील, तर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव पर्याय आहे.