हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ असल्याने धर्मांतरास बळी पडू नका ! – पू. ईश्वरबुवा रामदासी
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – हिंदु धर्मात जन्माला येणे, ही पुष्कळ पुण्याची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्माचे परकियांपासून रक्षण करण्यासाठी स्वतःचे जीवन सार्थकी लावले. अशा पावन भूमीत जन्मलो आहे. हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ असल्याने इतर धर्मियांच्या प्रलोभनांना बळी पडून धर्मांतरास बळी पडू नका. ज्यांनी खोट्या भूलथापांना बळी पडून परधर्म स्वीकारला आहे, त्यांना स्वधर्मी परतावे, असे आवाहन पू. ईश्वरबुवा रामदासी तथा पू. दादा महाराज यांनी केले. २० नोव्हेंबरला गोसावी समाजातील श्री कालिकामातेच्या जत्रेच्या निमित्त विश्व हिंदु परिषद आणि बजरंग यांच्या वतीने महाआरतीचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
शहरमंत्री प्रवीण सामंत यांनी विश्व हिंदु परिषदचे महत्त्व आणि कार्य सांगितले. या प्रसंगी पू. मौनीबाबा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भावेश पटेल, गोसावी समाजातील विशाल माळी, सागर माळी, रमेश माळी, तसेच समाजबांधव या प्रसंगी उपस्थित होते.