कर्नाटकातील वाढता जिहाद !
कर्नाटकातील मंगळुरूमध्ये १९ नोव्हेंबर या दिवशी झालेला स्फोट हा जिहादी आतंकवाद्यांनी घडवलेला बाँबस्फोट होता, असे निष्पन्न झाले आहे. मागील काही वर्षे भारतामध्ये आतंकवाद्यांनी बाँबस्फोट घडवून आणल्याच्या घटना उणावल्या आहेत; मात्र असे असले, तरी जिहादी आतंकवाद्यांची मनोवृत्ती पालटली आहे किंवा त्यांना हिंसक कारवाया घडवून आणायच्या नाहीत, असे नाही. जिहादी आतंकवाद्यांना देश अस्थिर करण्यासाठी कारवाया करायच्या आहेत; मात्र त्यांना ‘संधी’ मिळत नसल्यामुळे ते गप्प आहेत. मंगळुरू येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला शारिक हा आतंकवादी ‘इस्लामिक स्टेट’च्या संपर्कात होता. त्याने बाँबस्फोट घडवून आणण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्याचे ठरवले होते. त्याने सरावासाठी तुंगभद्रा नदीच्या किनारी असलेल्या जंगलात स्फोट घडवून आणण्याची चाचणी केली होती. स्फोटकांनी भरलेला प्रेशर कुकर रिक्शातून नेत असतांना त्याचा स्फोट झाला आणि शारिक याचे षड्यंत्र उघड झाले. यामुळे मोठी हानी टळली. असे जरी असले, तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कर्नाटक हे जिहादी कारवायांचा केंद्रबिंदू ठरत आहे. तेथील हिंदुत्वनिष्ठ या कारवायांना विरोधही करत आहेत. कर्नाटकात हिजाब घालण्यासाठी धर्मांध विद्यार्थिनींनी केलेल्या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर धर्मांधांची आक्रमकता आणि त्यांचे षड्यंत्र उघड झाले. येथील धर्मांध संघटितपणे राष्ट्रविघातक आणि हिंदुविरोधी कारवाया करून तेथे अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या बाँबस्फोटाचे अन्वेषण करतांना राज्यात जिहादी कारवाया करणार्यांच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शारिक याने काही काळापूर्वी भिंतींवर देशविरोधी लिखाण लिहिले होते; मात्र त्याला अटक करून नंतर सोडण्यात आले. यावरून धर्मांधांवर वचक निर्माण होण्यासाठी कायदे आणखी कठोर हवेत, हेच दिसून येते.
शारिक याची धर्मांध मानसिकता लक्षात घेऊन त्याच्यावर कायद्यान्वये कठोर कारवाई झाली असती, तर आज ही वेळ आली नसती. भारतात पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणे, भारतविरोधी घोषणा देणे, हिंदूंना धमकावणे यांसारख्या धर्मांध कारवाया करणार्यांवर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळेच या धर्मांधांना पुढे संधी मिळाल्यावर ते आतंकवादी कारवाया करतात. एखादा आतंकवादी लगेच आतंकवादी कारवाया करण्यासाठी पुढे येत नाही. प्रथम चिथावणीखोर भाषणे देणे किंवा तसे विचार प्रसारित करणे आदी ‘लहान-सहान’ कारवाया तो करतो. अशांवर जिहादी आतंकवादी संघटनांची नजर असतेच. अशांना जिहादी आतंकवादी संघटना प्रशिक्षण देऊन जिहादी आतंकवादी बनवतात. त्यामुळे मंगळुरू बाँबस्फोटाचे अन्वेषण करत असतांना पोलिसांनी राज्यात असलेल्या धर्मांधांवर कसा वचक बसवणार ?’, यासाठीही कृती कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यांना आजच रोखले, त्यांच्या मनात जरब निर्माण केली, तरच आतंकवादी कारवायांना खीळ बसेल !