हिजाबविरोधी खेळाडू !
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या वेळी इराण आणि इंग्लंड यांच्या संघांमध्ये सामना आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी इराणच्या खेळाडूंनी त्यांच्या देशाचे राष्ट्रगीत चालू असतांना ते म्हणण्यास नकार दिला. इराणमध्ये सध्या हिजाबच्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन चालू आहे. अनेक महिला रस्त्यावर उतरून हिजाबसक्तीला विरोध करत आहेत. भारतात सरकारच्या विरोधात आंदोलन केले आणि ते देशहितार्थ नसले, तरी ते करणार्यांना कारागृहात डांबणे किंवा शिक्षा देणे, असले प्रकार होत नाहीत. शाहीनबाग येथे झालेले आंदोलन किंवा कृषी कायद्यांच्या विरोधात झालेले आंदोलन असो, या आंदोलकांच्या मागण्या राष्ट्रविरोधी होत्या. त्यांना राष्ट्रविघातक शक्तींचा पाठिंबा होता. हे ठाऊक असूनही आंदोलनकर्त्यांवर कारवाई झाली नाही. इराणमध्ये मात्र जे हिजाबविरोधी आंदोलन चालू आहे, ते महिलांच्या हिताचे आहे; मात्र ते चिरडण्यासाठी सरकार आटापिटा करत आहे. आंदोलन केले; म्हणून शेकडोंना कारागृहात डांबण्यात आले आहे. आतापर्यंत ४०० जण या आंदोलनात ठार झाले आहेत, तर काही जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यादृष्टीने इराणच्या फुटबॉल संघाने उचललेल्या पावलामुळे त्यांच्यावर कठोर कारवाईही होऊ शकते. भारतात जसे क्रिकेटला महत्त्व आहे, तसे इराणमध्ये फुटबॉलला महत्त्व दिले जाते. ‘इराणी संघाने विश्वचषक स्पर्धेच्या वेळी देशात महिला करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून या सूत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचा फोडावी’, अशी तेथील नागरिकांची अपेक्षा होती. या पार्श्वभूमीवर संघाने कोणत्याही परिणामांची पर्वा न करता राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देऊन तेथील महिलांना पाठिंबा दिला, हे येथे अधोरेखित करावेसे वाटते.
भारतीय क्रिकेटपटूंनी यातून बोध घेण्यासारखे आहे. एखाद्या राष्ट्रीय समस्येवर किंवा भारतातील हिंदूंच्या संदर्भातील सूत्रांवर भारतीय क्रिकेटपटूंनी उघडपणे भूमिका घेऊन हिंदूंचे समर्थन केले, असे क्वचित् दिसते. वलयांकित खेळाडू अशा गोष्टींपासून लांब रहातांना दिसतात. ‘एखाद्या सूत्रावर भूमिका घेतल्यास स्वतःचा चाहतावर्ग दुखावेल किंवा लांब जाईल’, असे त्यांना बहुदा वाटत असावे. त्यामुळेच लव्ह जिहाद, हिंदूंचे धर्मांतर, काश्मिरी हिंदूंची समस्या आदी विषयांवर कुणीही भूमिका घेतांना दिसत नाही. हेच कशाला ? ‘इंडियन प्रिमियर लिग’मधील (आय.पी.एल्.मधील) भ्रष्ट कारभार अनेक वेळा चव्हाट्यावर येऊनही भारतीय खेळाडू त्याविषयी मूग गिळून बसले. ‘असे न करण्यामागे त्यांचे आर्थिक हित दडले होते’, हे वेगळे सांगायला नको. जे एखाद्या समस्येवर बोलायला धजावत नाहीत, ते संबंधित समस्या सुधारण्यासाठी कृती काय करणार ? क्रिकेटपटूंनी ‘विविध देशांमध्ये खेळतांना देशाचे प्रतिनिधित्व करणे’ एवढ्यापुरते मर्यादित न रहाता एक जागरूक नागरिक म्हणून स्वतःची भूमिका बजावणे आवश्यक आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !
इराणी महिलांच्या मागे ठामपणे उभे राहून त्यांना पाठिंबा देणार्या इराणी फुटबॉलपटूंकडून भारतीय क्रिकेटपटूंनी बोध घ्यावा ! |