उच्च पातळीच्या संतांनी समाधी घेण्याचे कारण आणि त्यांनी समाधी घेतल्यानंतरही चैतन्याच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविरत चालू रहाणे
‘२८.१०.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात संतांनी समाधी घेण्याच्या संदर्भात आलेले विचार’ ही चौकट प्रसिद्ध झाली होती. या चौकटीतील ‘जेव्हा संतांना या भूतलावर आता अधिक करण्यासारखे किंवा मिळवण्यासारखे काही उरलेले नाही, याची जाणीव होऊ लागते, तेव्हा त्यांना या जगातून पुढील लोकांत जाण्याची ओढ लागते. त्यामुळे ते समाधी घेतात.’ (उच्च स्तराच्या संतांच्या मनातील ही प्रतिक्रिया असते. त्यांची या लेखात दिलेली पुढील अवस्था असते. – संकलक) हे वाक्य वाचल्यावर माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया पुढे देत आहे.
१. उच्च पातळीच्या संतांचे समाजाकडून साधना करवून घेण्याचे कार्य पूर्ण झाल्यावर त्यांना पुढील लोकांत जाण्याची ओढ लागणे
‘संतांना समाधी घ्यावी’, असे वाटणे, याचा अर्थ ‘त्या संतांचा आध्यात्मिक स्तर अतिशय उच्च पातळीचा, म्हणजे ‘परात्पर गुरु’ पातळीचा असावा’, असे जाणवते. त्यामुळे त्यांना ‘या भूतलावर आता करण्यासारखे किंवा मिळवण्यासारखे काही राहिले नाही’, याची जाणीव होऊन ते समाधी घेतात, उदा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, श्री समर्थ रामदासस्वामी ! या संतांचे कार्य समाजाला साधना सांगून त्यांच्याकडून ती करवून घेणे, तसेच राष्ट्र आणि धर्म यांवर आलेल्या संकटांविषयी समाजाला जागृत करणे इत्यादी असल्याने हे कार्य त्यांच्याकडून पूर्ण झाल्यावर त्यांना पुढील लोकांत जाण्याची ओढ लागते. त्यामुळे ते समाधी घेतात.
२. संतांनी समाधी घेतल्यानंतरही त्यांच्या उच्च आध्यात्मिक स्तरामुळे समाधीच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे त्यांचे कार्य अविरत चालू रहाणे
संत इतके दयाळू आणि कृपाळू असतात की, समाधी घेतल्यानंतरही त्यांच्या उच्च आध्यात्मिक स्तरामुळे समाधीच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्या ऊर्जेचा आध्यात्मिक लाभ ते त्यांच्या भक्तांना शेकडो वर्षे करून देतात आणि भक्तांकडून साधना करवून घेतात. याचा अर्थ संतांनी जरी देहाचा त्याग केला, तरीही त्यांचे चैतन्य त्यांच्या समाधीच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला शेकडो वर्षे मिळत रहाते आणि त्यांचे कार्य अविरत चालू रहाते.’
– श्री. धनंजय कर्वे, बांदोडा, फोंडा, गोवा. (१२.११.२०२१)