(म्हणे) ‘गांधींजींच्या हत्येसाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली !’

गांधीजींचे नातू तुषार गांधी यांचा आरोप

मुंबई – बापूंच्या (म. गांधी यांच्या) हत्येच्या २ दिवस आधीपर्यंत नथुराम गोडसे याच्याकडे हत्या करण्यासाठी शस्त्र नव्हते. सावरकर यांनी केवळ इंग्रजांना साहाय्यच केले नाही, तर बापूंच्या हत्येसाठी नथुराम गोडसे याला एक चांगली बंदूक पुरवली, असा गंभीर आरोप गांधीजींचे नातू तुषार गांधी यांनी ‘ट्वीट’द्वारे केला.

ट्वीटद्वारे आणि प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना तुषार गांधी म्हणाले, ‘‘वर्ष १९३० च्या दशकामध्ये बापूंवर आक्रमणाचे अनेक प्रयत्न झाले. स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांनी बापूंच्या साथीदारांना अकोला आणि विदर्भ येथे त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे बापूंचे प्राण वाचवले. प्रबोधनकार ठाकरे यांनी बापूंवरील प्राणघातक आक्रमण रोखण्यासाठी सनातनी हिंदु संघटनांच्या महाराष्ट्रातील नेतृत्वांना सार्वजनिक आवाहन केले. तेव्हा त्यांचा रोख सावरकर आणि हेडगेवार यांच्याकडेच होता. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्यांच्या या इतिहासाची आठवण करून दिली पाहिजे. मी इतिहासात जी नोंद आहे, तेच सांगत आहे. हा आरोप नाही. इतिहासात हेच सांगितले आहे. पोलिसांच्या ‘एफ्.आय्.आर्.’मध्येही तशी नोंद आहे. २६ आणि २७ जानेवारी १९४८ च्या कालावधीत नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकर यांना भेटले. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसे याच्याकडे बंदूक नव्हती. बंदुकीच्या शोधात तो संपूर्ण मुंबईत फिरला; मात्र या भेटीनंतर तो थेट देहलीला गेला. तेथून ग्वाल्हेर गाठले. तेथे सावरकरवादी परचुरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांना सर्वांत चांगली बंदूक मिळवून दिली. बापूंच्या हत्येच्या २ दिवस आधी हे सर्व घडले. मी हेच सांगितले. नवीन आरोप केलेला नाही.’’ (सावरकर यांच्यावर गंभीर आरोप करायचे; मात्र मुसलमानांच्या लांगूलचालनापोटी ‘खिलाफत’सारख्या गोष्टींना पाठिंबा देणे, स्वामी श्रद्धानंद यांचा मारेकरी अब्दुल रशीद याचे ‘भाई रशीद’ म्हणून उदात्तीकरण करणे, या म. गांधीजींच्या दुटप्पी भूमिकेविषयी गप्प बसायचे ! हा तुषार गांधी यांचा दुटप्पीपणाच होत. स्वत:च्या सोयीनुसार राजकीय वक्तव्य करणार्‍या तुषार गांधी यांचे करे स्वरूप ओळखा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

गांधीहत्येच्या खटल्यात न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तरीही असे विधान करून तुषार गांधी हे न्यायालयाचा आणि पर्यायाने राज्यघटनेचा अवमानच करत आहेत ! अशांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे !