५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. अदिती परशराम सुतार (वय ४ वर्षे) !
उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. अदिती परशराम सुतार या पिढीतील आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
१. गर्भारपण
पुष्कळ शारीरिक त्रास होणे आणि श्रीकृष्णाला सतत प्रार्थना होणे : ‘गर्भवती असतांना मला उलट्या होणे, चक्कर येणे, अशक्तपणा येणे, असे पुष्कळ शारीरिक त्रास झाले. बाळ सुखरूप असावे; म्हणून माझ्या मनाला सतत हुरहुर लागायची. त्या वेळी माझी सतत श्रीकृष्णाला प्रार्थना व्हायची, ‘बाळाने पुष्कळ साधना करावी. मला साधना करणे जमले नाही, ती साधना बाळाकडून व्हावी.’ या प्रार्थनेतून मला शक्ती मिळायची आणि त्रासाकडे दुर्लक्ष करता यायचे.’ – सौ. मुक्ता परशराम सुतार (बाळाची आई), पुणे
२. शस्त्रक्रिया करून बाळाचा जन्म होणे
‘ताईची प्रसूती नैसर्गिक होण्यासाठी आधुनिक वैद्यांनी प्रयत्न केले. पुष्कळ वाट पाहिली; पण नैसर्गिक प्रसूती होत नसल्याने त्यांनी शस्त्रक्रिया केली आणि बाळाचा जन्म झाला.’ – कु. आरती नारायण सुतार (बाळाची छोटी मावशी) आणि सुतार कुटुंबीय, म्हापसा, गोवा.
३. बाळाच्या जन्मानंतर
३ अ. जन्म ते १ मास
३ अ १. मुलगी झाल्यावर ‘राधा’ जन्माला आली’, असे वाटणे : ‘१.९.२०१८ या दिवशी बाळाचा जन्म झाला. मला कृष्णाच्या रूपात मुलाची अपेक्षा होती; पण मुलगी झाल्यावर ‘राधा जन्माला आली आणि मागून कृष्णही येईल’, असा पहिला विचार आला. बाळ हसतमुख होते. माहेरी आणि सासरी हे पहिलेच बाळ असल्याने सर्वांनाच आनंद झाला आणि बाळ सर्वांचे लाडके झाले.’ – सौ. मुक्ता परशराम सुतार
३ अ २. ‘बाळ सात्त्विक आहे’, असे जाणवून बाळाला हातात घेताच शांत वाटणे : ‘मी बाळाला पाहिले. तेव्हा बाळाच्या हाताच्या बोटांची मुद्रा केलेली होती. ‘बाळ ध्यानात आहे, तसेच ते कोणत्यातरी उच्च लोकातून आले आहे’, असे मला वाटले. बाळाला हातात घेताच मनाला शांत वाटले. ‘बाळ सात्त्विक आहे’, असे जाणवत होते. ताईची शस्त्रक्रिया झाल्यामुळे तिला ८ दिवस रुग्णालयात ठेवले होते आणि बाळ मूत्रविसर्जन करत नसल्याने त्याला अतीदक्षता विभागात ठेवले होते.’
– कु. आरती नारायण सुतार
३ अ ३. ‘बाळाच्या हास्यातून शक्ती मिळत आहे’, असे वाटणे : बाळ जन्माला आल्यावर ‘बाळाला जन्म देणे आणि त्याचा सांभाळ करणे सोपे नाही’, हे मला समजले. बाळ अतीदक्षता विभागात असतांना मला शारीरिक आणि मानसिक त्रास झाला. त्या वेळी मला बाळाच्या हसण्यातूनही प्रयत्न करायला शक्ती मिळत होती.’ – सौ. मुक्ता परशराम सुतार
३ आ. वय १ ते ३ मास
३ आ. बाळ रडतांना परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केल्यास, तसेच रामरक्षा किंवा भजन लावल्यास शांत होणे आणि आजोळहून वडिलांच्या घरी जातांना बाळ पुष्कळ रडणे : ‘अदिती रडत असतांना परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केल्यास, तसेच रामरक्षा किंवा भजन लावल्यास शांत बसायची. अदिती झोपेत गोड हसायची. तिला काही विचारल्यावर ‘हा’ म्हणायची. तेव्हा ‘तिला सगळे समजते’, असे वाटायचे. तिसर्या मासात ताई सासरी जायला निघाली. तेव्हा अदिती पुष्कळ रडली. ते पाहून ‘आता आपण दुसर्या घरी जाणार’, हे तिला समजत आहे’, असे वाटले. तिच्या रडण्यातून तिच्या भावना दिसून येत होत्या. त्या वेळी ‘लहान बाळालाही किती कळते’, हे लक्षात आले.’ – कु. आरती नारायण सुतार
३ इ. ३ मास ते १ वर्ष
३ इ १. अदितीला सांभाळतांना स्वतःतील स्वभावदोषांची जाणीव होऊ लागणे : ‘जसजसे दिवस जात होते, तसतसे अदितीत पालट होत होते. ती एका क्षणात हसायची, तर कधी रडायची, तर कधी रागवायचीही. त्यामुळे माझे स्वभावदोष उफाळून यायचे. श्रीकृष्ण मला स्थिर रहायला शिकवून माझ्या स्वभावदोषांची मला जाणीव करून द्यायचा. तिच्यामुळे ‘माझी थोडी फार साधना होते’, असे मला वाटते.
३ इ २. शारीरिक त्रास होत असतांना अदितीला ‘तू झोप’, असे सांगितल्यावर ती लगेच झोपणे : जन्मापासूनच अदितीची झोप पुष्कळ अल्प आहे. कधी कधी मला पुष्कळ शारीरिक त्रास व्हायचा. तेव्हा मी अदितीला सांगायचे, ‘बाळा, आता तू झोप, म्हणजे मलासुद्धा झोपता येईल आणि काही वेळातच अदिती झोपायची. मला या गोष्टीचे नवल वाटायचे.’
– सौ. मुक्ता परशराम सुतार
३ इ ३. बोलण्याला प्रतिसाद देणे आणि कौतुक केलेले न आवडणे : ‘अदितीचे वागणे, बोलणे आणि हसणे पाहून नवल वाटायचे; कारण ती एवढ्या लहान वयात उत्तर द्यायचा प्रयत्न करायची. ‘तिला सर्व समजते’; म्हणून तिचे कौतुक केले की, ती रडायची. त्यामुळे ‘तिला कौतुक केलेले आवडत नाही’, हे लक्षात आले.
३ इ ४. संगीताची आवड : अदितीसमोर कुणी तबला वाजवत असले, तर ती शांत राहून ऐकायची आणि हात-पाय हलवायची. त्यामुळे तिला गाण्याची ओढ आहे’, असे वाटले.’
– कु. आरती नारायण सुतार
४. स्वभावदोष : ‘राग येणे आणि हट्टीपणा करणे.
कधी कधी वाटते, ‘देवाने मला त्याचे सर्वांत सुंदर फूल दिले आहे. ‘हे श्रीकृष्णा, तू मला एवढे गोड बाळ दिल्याबद्दल मी तुझी पुष्कळ कृतज्ञ आहे. मी तुझ्या चरणी प्रार्थना करते, ‘अदितीच्या साधनेत कोणतेही अडथळे येऊ नयेत. मला तिच्यावर चांगले संस्कार करता येऊ देत’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.’
– सौ. मुक्ता परशराम सुतार (चि. अदितीची आई), पुणे (१४.९.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |