राज्यपालांनी पदावर रहाण्याविषयी पुनर्विचार करावा ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते
मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ‘त्यांनी आता पदावर रहाण्याविषयी पुनर्विचार करावा’, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याविषयी ट्वीट करत म्हटले की, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालीन आणि सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी ३ वर्षांहून अधिक काळ राहूनही कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर त्यांनी पदावर रहाण्याविषयी पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. ‘पंतप्रधान मोदी यांनी राज्यपालांच्या अनावश्यक, निंदनीय वक्तव्यांची गांभीर्याने नोंद घेण्याची वेळ आली आहे’, असेही पवार म्हणाले.