राज्यातील ऐतिहासिक वास्तू आणि गड यांच्या संवर्धनासाठी निधी देण्यास शासन कटीबद्ध ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
पुणे – राज्य अनेक ऐतिहासिक वास्तू आणि गड यांनी समृद्ध आहे. हा समृद्ध इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हा इतिहास जपला जात आहे. या विभागाद्वारे अशा ऐतिहासिक वास्तू आणि गड आदींचे जतन अन् दुरुस्तीचे कार्य होत असून यासाठी शासनही पाठिंबा देईल. निधीअभावी या कामात अडथळा येऊ नये, यासाठी शासनाद्वारे आवश्यक निधी दिला जाईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्व विभाग पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ऐतिहासिक वास्तू, गड, शिलालेख आदींच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले की, राज्यातील गड मजबूत आणि सुरक्षित असून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, स्वातंत्र्याचा इतिहास, तसेच राज्याचा प्राचीन वारसा हा लोकांपर्यंत अन् पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचे कार्य पुरातत्व विभागाच्या वतीने व्हावे, यासाठी शासनही विभागाला सहकार्य करेल. असे ऐतिहासिक गड आणि वास्तू यांच्या जतन/संवर्धनाकडे शासन गांभीर्याने पहात आहे.