वर्ष २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल ! – गौतम अदानी, अध्यक्ष, अदानी उद्योग समूह
मुंबई – देशाच्या अंतर्गत मागणीमुळे भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ होते. ‘स्टार्ट-अप्स’ (नवीन उद्योग चालू करण्यासाठी सरकारी साहाय्य) संख्येमुळेही भांडवल गुंतवणुकीत वाढ होईल. वर्ष २०२१ मध्ये भारतातील ‘युनिकॉर्न’ निर्मितीचा वेग जगातील सर्वांत वेगवान ठरला. वर्ष २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, असा विश्वास अदानी उद्योग समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी व्यक्त केला. मुंबई येथे ‘जिओ कन्व्हेन्शन सेंटर’ येथे चालू असलेल्या ‘वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटट्स’ या कार्यक्रमात ते ‘आर्थिक महासत्ता होण्याचा भारताचा मार्ग’ या विषयावर बोलत होते.
India to be world’s 2nd largest economy by 2050, to add a trillion dollar to GDP every 12-18 months: Gautam Adani pic.twitter.com/nL4tAJoa4Q
— Cyberking Capitals (@cyberkingck) November 19, 2022
गौतम अदानी पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०५० पर्यंत भारत जगातील दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. एकेकाळी वसाहतवाद्यांनी चिरडलेेला भारत देश आज लक्षणीय विकासाच्या उंबरठ्यावर उभा आहे. ‘१९४७ नंतर भारतात लोकशाही व्यवस्था टिकणार नाही’, असे म्हटले जात होते. लोकशाही आणि देशातील विविधतेशी कोणतीही तडजोड न करता एक ‘उच्च उत्पन्न असलेले राष्ट्र’ म्हणून भारत उदयास येत आहे. या कालावधीत भारताच्या दरडोई उत्पन्नात ७०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होईल. भारतातील परदेशी गुंतवणूक १०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक होईल.’’