‘आंतरधर्मीय विवाह झालेल्या युवती सुखरूप आहेत ना ?’ याची माहिती घ्या ! – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बालकल्याण मंत्री
श्रद्धा वालकर हत्याप्रकरणानंतर राज्यशासनाचा महिला आयोगाला आदेश
मुंबई – श्रद्धा वालकरप्रमाणे महाराष्ट्रात अन्यही प्रकरणे असू शकतात. त्यामुळे आंतरधर्मीय विवाह झालेल्या युवती सुखरूप आहेत ना ? याची महिला आयोगाने माहिती घ्यावी. ही माहिती घेण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करावी, असा आदेश राज्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना दिला आहे. स्वत: मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना ही माहिती दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना मंगल प्रभात लोढा म्हणाले, ‘‘रुपाली चाकणकर यांच्याशी श्रद्धा वालकर प्रकरणाविषयी माझी चर्चा झाली. ज्या मुलींचे कुटुंबियांसमवेत संबंध तुटत आहेत, अशी अन्यही प्रकरणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महिला आयोगाने पुढे येऊन अशा मुलींचा शोध घेतला पाहिजे. महिला आयोग या मुलींना काय साहाय्य करू शकतो ? याकडे लक्ष दिले पाहिजे, असा आदेश मी दिला आहे. संबंधित मुली किंवा महिला अडचणीत असतील, तर त्यांना शक्य ते सर्व साहाय्य राज्यशासन करणार आहे.’’
वसई येथील श्रद्धा वालकर या हिंदु युवतीसमवेत देहली येथे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) राहून आफताब पुनावाला याने तिची निर्घृण हत्या केली. समाजाला हादरवणार्या या घटनेमुळे राज्यशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.