सात्त्विक आकाराचे दागिने स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी ! – कु. मिल्की अगरवाल, फोंडा, गोवा
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘दागिन्यांचा व्यक्तीवर होणारा परिणाम’ या विषयावर फ्रान्समध्ये ‘ऑनलाईन’ शोधनिबंध सादर !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क आहेत सहलेखक !
फोंडा (गोवा) – आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक आकाराचे दागिने सात्त्विक स्पंदने आकर्षित करू शकतात आणि स्त्रीला तिच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये साहाय्यभूत ठरू शकतात, तर आध्यात्मिकदृष्ट्या नकारात्मक आकाराचे दागिने रज-तमात्मक स्पंदने आकर्षित करू शकतात आणि स्त्रीच्या प्रभावळीवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दागिने परिधान करणारी व्यक्ती, दागिने बनवणार्या कारागिराची आध्यात्मिक स्थिती, ती बनवण्यासाठी वापरलेला धातू आणि दागिन्यांचे आकार या घटकांवर त्यांची सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने आकर्षित करण्याची क्षमता अवलंबून असते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कु. मिल्की अगरवाल यांनी केले.
फ्रान्समध्ये ‘आयकॉन एलएलसी’ या ग्रुपने प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या ‘फॅशन, ब्युटी अन् कॉस्मेटोलॉजी एक्स्पो (एफ्.बी.सी.२०२२)’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या. कु. अगरवाल यांनी या परिषदेत ‘दागिन्यांचा आपल्या प्रभावळीवर कसा परिणाम होतो’, या विषयावरील शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) हे सहलेखक आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस.) आणि ‘पॉलिकॉन्ट्रास्ट इन्टरफीअरन्स् फोटोग्राफी’ (पीआयपी) यांचा वापर करून सिद्ध केलेले संशोधन कु. मिल्की अगरवाल यांनी या परिषदेत सादर केले.
कु. मिल्की अगरवाल यांनी मांडलेली सूत्रे१. ‘सोने’ हा आध्यात्मिकदृष्ट्या सर्वांत मौल्यवान धातू आहे; परंतु त्याचे आध्यात्मिक मूल्य आध्यात्मिकदृष्ट्या नकारात्मक आकारामुळे सहज न्यून होऊ शकते. जर दागिने बनवणारा कारागीर आणि दागिने परिधान करणारी व्यक्ती नकारात्मक ऊर्जेने बाधित असेल, तर त्यांचा दागिन्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो. आज दागिन्यांकडे केवळ मानसशास्त्रीय स्तरावर पाहिले जाते आणि त्यामुळे आध्यात्मिक दृष्टीकोनातून दागिन्यांचा खरा उद्देश साध्य होत नाही. २. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनामध्ये ३ प्रकारच्या दागिन्यांची सूक्ष्म ऊर्जा आणि ते परिधान करणार्या स्त्रीच्या प्रभावळीवर होणारा परिणाम यांची चाचणी घेण्यात आली. ३. यातील पहिला दागिना ‘फॅशन ज्वेलरी’ श्रेणीतील, दुसरा दागिना २२ कॅरेट सोन्याचा आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य आकाराचा आणि तिसरा दागिना २२ कॅरेट सोन्याचा आध्यात्मिकदृष्ट्या योग्य आकाराचा होता. ४. या चाचणीत असे आढळून आले की, पहिल्या आणि दुसर्या दागिन्याततून प्रामुख्याने रज-तम स्पंदने प्रक्षेपित झाली आणि त्याचा स्त्रीच्या प्रभावळीवर नकारात्मक परिणाम झाला. तिसर्या हारातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित झाली आणि स्त्रीच्या प्रभावळीवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला. ५. सारांश सांगायचा झाल्यास जर दागिन्यांविषयी मूलभूत आध्यात्मिक संकल्पना कारागीर आणि खरेदीदार यांनी पाळल्या, तर दागिन्यांचे खरे मूल्य वाढेल अन् ते स्त्रीच्या आध्यात्मिक प्रगतीला लाभदायक ठरू शकेल. |