हिंदु धर्मशास्त्रानुसार (धार्मिक पद्धतीने) विवाहविधी केल्यामुळे वधूवरांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ
हिंदु धर्मशास्त्रानुसार (धार्मिक पद्धतीने) विवाहविधी केल्यामुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या वधूवरांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘हिंदु धर्माने जीवनात घडणार्या प्रमुख सोळा प्रसंगी ईश्वराच्या जवळ जाता यावे, यासाठी करावयाचे ‘सोळा संस्कार’ सांगितले आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा संस्कार म्हणजे ‘विवाहसंस्कार’ ! विवाहाचा खरा उद्देश आहे – ‘दोन जिवांचे भावी जीवन एकमेकांना पूरक आणि सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे !’ यासाठी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे विवाहविधी करणे आवश्यक असते. वर्ष २०१८ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २ विवाह झाले. हे दोन्ही विवाह हिंदु धर्मशास्त्रानुसार (धार्मिक पद्धतीने) करण्यात आले. ‘हिंदु धर्मशास्त्रानुसार (धार्मिक पद्धतीने) केलेल्या विवाहविधींमुळे वधू आणि वर यांना आध्यात्मिकदृष्ट्या कोणते लाभ होतात ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी विवाहस्थळी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.
१. चाचणीतील आध्यात्मिक त्रास असलेले आणि आध्यात्मिक त्रास नसलेले वधू आणि वर यांची माहिती
१ अ. आध्यात्मिक त्रास असलेली वधू आणि आध्यात्मिक त्रास असलेला वर : या चाचणीतील आध्यात्मिक त्रास असलेली वधू सनातनची साधिका आहे. ती प्रासंगिक सेवा करते. आध्यात्मिक त्रास असलेला वर अन्य संप्रदायानुसार साधना करतो.
१ आ. आध्यात्मिक त्रास नसलेली वधू आणि आध्यात्मिक त्रास नसलेला वर : या चाचणीतील आध्यात्मिक त्रास नसलेली वधू आणि आध्यात्मिक त्रास नसलेला वर हे दोघे सनातनचे पूर्णकालीन साधक आहेत. या दोघांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ते सनातनच्या आश्रमात राहून साधना करतात.
हे दोन्ही विवाह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करण्यात आले.
२. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन : या चाचणीतील दोन्ही विवाहांतील वधू आणि वर यांच्या विवाहविधीपूर्वी (आदल्या दिवशी ‘हळद लावणे’ या विधीपूर्वी) आणि विवाहविधी झाल्यानंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.
२ अ. विवाहविधी झाल्यावर आध्यात्मिक त्रास असलेली वधू आणि आध्यात्मिक त्रास असलेला वर यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत घट होणेे : आध्यात्मिक त्रास असलेली वधू आणि आध्यात्मिक त्रास असलेला वर यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. विवाहविधी झाल्यावर त्या दोघांतील नकारात्मक ऊर्जेत घट झाली, हे पुढील सारणीतून लक्षात येते.
२ आ. विवाहविधी झाल्यावर आध्यात्मिक त्रास नसलेली वधू आणि आध्यात्मिक त्रास नसलेला वर यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : आध्यात्मिक त्रास नसलेली वधू आणि आध्यात्मिक त्रास नसलेला वर यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. विवाहविधी झाल्यावर त्या दोघांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली, हे पुढील सारणीतून लक्षात येते.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
अ. ‘विवाह हा ‘शिव आणि शक्ति’ या दोहोंना एकमेकांना अनुरूप बनवणारा एक पवित्र संस्कार असल्याने, मंत्रयुक्त नादाने भारित असणार्या वातावरणात विवाहरूपी पवित्र बंधनात अडकून शिव-शक्तीरूपी ऐक्यातून वैराग्याचा महामंत्र घेऊन जीवनाच्या अंती मुक्त होणे, हाच विवाहाचा खरा गर्भीतार्थ आहे.’ (संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ – ‘विवाहसंस्कार : शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा’)
३ आ. धार्मिक पद्धतीने विवाह करतांना विवाहदिनी केले जाणारे काही विधी / कृती आणि त्यांचे महत्त्व : ‘मुंडावळ्या बांधणे, अंतःपटधारणविधी, मंगलाष्टके म्हणणे, परस्परनिरीक्षणविधी आणि पुष्पमाळ घालणे, अक्षतारोपणविधी (वधू-वरांवर अक्षता वहाणे), मंगळसूत्रबंधन, सप्तपदी आदी. या सर्वच विधींमागे काही ना काही अध्यात्मशास्त्रीय कारण आहे. त्याचे सूक्ष्म परिणाम वधू आणि वर यांवर होतात. त्यांना देवतांचा आशीर्वाद मिळतो, तसेच चैतन्य मिळते.
३ इ. धार्मिक पद्धतीने केलेल्या विवाहविधीतून चैतन्य मिळाल्याने वधूवरांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ : हिंदु धर्मशास्त्रानुसार केलेल्या विवाहविधीतून चैतन्य मिळते. या चाचणीतील दोन्ही विवाह धर्मशास्त्रानुसार झाले आहेत. तसेच विवाहाचे स्थळ, पुरोहित आदी सात्त्विक होते. दोन्ही विवाहांतील वधू आणि वर हे साधक असल्याने विवाहविधी चालू असतांना ते ईश्वराच्या अनुसंधानात होते. यामुळे वधूवरांना पुढीलप्रमाणे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.
१. आध्यात्मिक त्रास असलेली वधू आणि आध्यात्मिक त्रास असलेला वर यांना विवाहविधीतील चैतन्याचा लाभ झाल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा घटली. (त्यांना असलेल्या आध्यात्मिक त्रासाशी (नकारात्मक स्पंदनांशी) लढण्यात विवाहविधीतून प्रक्षेपित झालेली सकारात्मक स्पंदने (चैतन्य) व्यय झाल्यामुळे त्या वधू-वरांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही.)
२. आध्यात्मिक त्रास नसलेली वधू आणि आध्यात्मिक त्रास नसलेला वर यांच्यामध्ये विवाहविधीपूर्वीही सकारात्मक ऊर्जा होती. याचे कारण ते दोघेही अनेक वर्षांपासून साधना करत आहेत. त्यामुळे त्यांच्यातील सत्त्वगुणात वाढ झाली आहे. त्यांची साधनेत प्रगती झाल्याने त्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी गाठली आहे. तसेच त्यांना आध्यात्मिक त्रास नाही. यामुळे विवाहविधीतून प्रक्षेपित झालेल्या सकारात्मक स्पंदनांचा (चैतन्याचा) त्यांना पूर्ण लाभ झाला; म्हणून त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.
थोडक्यात, विवाहासाठी इच्छुक असणार्या स्त्रीपुरुषांनी हिंदु धर्मशास्त्रानुसारच विवाह करावा; कारण असा विवाहच व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर लाभदायक ठरतो. हिंदु धर्मात शारीरिक वासनांची पूर्ती करण्यासाठी विवाह विधी सांगितलेला नाही, तर चार पुरुषार्थांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून हळूहळू ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकडे जाता यावे, यासाठी विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे. समाजात सुप्रजा निर्माण होऊन समाजाचे अस्तित्व टिकावे आणि त्याचा उत्कर्ष व्हावा, यांसाठी पवित्र अशा या विवाहसंस्काराची, म्हणजे गृहस्थधर्माची स्थापना झाली आहे. विवाहसंस्थेचे जतन करण्यातच संपूर्ण समाजाचे, पर्यायाने राष्ट्राचे सर्वंकष कल्याण आहे.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.८.२०१८)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
नोंदणी विवाहापेक्षा (‘रजिस्टर मॅरेज’पेक्षा) धार्मिक पद्धतीने केलेला विवाह श्रेयस्कर !आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी नसलेला ‘नोंदणी विवाह’ : ‘नोंदणी विवाह’ ही पद्धत १८७२ मध्ये इंग्रजांच्या राजवटीत निर्माण झाली. या माध्यमातून मिळणार्या करातून शासकीय उत्पन्न वाढवणे, हा ब्रिटिशांचा मुख्य उद्देश होता. हिंदुस्थानात आजही ही पद्धत पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाच्या सवयीतून किंवा काटकसर म्हणून पाळली जाते. या विवाहात कोणताही विधी न करता, तसेच मुहूर्त इत्यादी न पहाता कागदोपत्री विवाह केला जातो. हिंदु धर्मानुसार मनुष्याचा जन्म ईश्वरप्राप्तीकरता आहे. गर्भधारणा ते विवाहापर्यंतच्या काळात जीवनात घडणार्या प्रमुख सोळा प्रसंगी केलेल्या धार्मिक संस्कारांमुळे मनुष्य ईश्वराच्या अधिक जवळ जातो, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. धार्मिक पद्धतीने विवाह केलेल्या अनेकांना याविषयी अनुभूतीही आल्या आहेत. नोंदणी विवाहात कोणतेही धार्मिक विधी होत नसल्यामुळे वधूवरांवर धर्मसंस्कार होत नाहीत. त्यामुळे अशा विवाहाला नैर्बंधिक (कायदेशीर) मान्यता जरी मिळाली, तरी हा विवाह आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक ठरत नाही. यास्तव अल्प व्ययासाठी (खर्चासाठी) नोंदणी विवाहाचा धर्मविरोधी पर्याय न निवडता अत्यंत साध्या पद्धतीने; मात्र सर्व धार्मिक विधींसह विवाह करणे अधिक श्रेयस्कर आहे.’ (संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ – ‘विवाहसंस्कार : शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा’) |