हिंदु जनजागृती समितीच्या ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ अभियानात पुणे येथील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !
हिंदूंनी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त लावले घरोघरी दीप !
पुणे, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ नोव्हेंबर या दिवशी असणार्या त्रिपुरारि पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंना घरोघरी दीप लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील हिंदूंनी, ‘प्रभु श्रीरामचंद्रांचे ‘रामराज्य’ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ यांप्रमाणे आपले जीवन आदर्श होऊन, राष्ट्र आणि धर्म यांवरील सर्व संकटे दूर होऊन आदर्श हिंदू राष्ट्राची स्थापना होवो’ अशी प्रार्थना करत आपापल्या घरासमोर दीप लावले. या अभियानात धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. केडगाव, सासवड, कोलवडी, हडपसर, थेऊर यांसह शेकडो महिला-पुरुषांनी यात सहभाग घेतला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान; आचार्य अत्रे मंडळ सासवड; श्री संगमेश्वर मंदिर समिती सासवड ; राधाकृष्ण मंदिर ट्रस्ट, हडपसर; विठ्ठल मंदिर उत्सव मंडळ, थेऊर इत्यादी संघटना या मोहिमेमध्ये सहभागी झाल्या होत्या.
एक दीप म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, यासाठी केलेली कृतीमय प्रार्थनाच आहे ! – डॉ. नीलेश लोणकर, ‘स्वा. सावरकर युवा मंच’चे संस्थापक अध्यक्ष
केडगाव येथील ‘स्वा. सावरकर युवा मंच’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी सांगितले की, हिंदु राष्ट्राचा हा दीप घरोघरी लावायला हवा. ‘मी एकटा हिंदु, हिंदुराष्ट्रासाठी काय करणार?’, असा विचार न करता हा एक दीप म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, यासाठी केलेली कृतीमय प्रार्थनाच आहे, असा भाव ठेवल्यास हिंदु राष्ट्राची पहाट नक्कीच उगवेल !