यावल (जळगाव) येथील महाविद्यालयात अचानक गणवेश पालटण्याचा निर्णय !
महाविद्यालय प्रशासनाचा मनमानी कारभार !
जळगाव – यावल येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गणवेश अचानक पालटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्षाचा अर्धा कालावधी उलटला असतांना नवीन ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पालकांनी खेद व्यक्त केला आहे. या निर्णयाविरोधात संस्था अध्यक्ष आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांना १६ नोव्हेंबर या दिवशी ‘यावल तालुका भीम आर्मी’च्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,
१. अचानक गणवेशात पालट करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना ८०० ते ९०० रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. मुलींसाठी पंजाबी ड्रेसकोड न करता सूट आणि पँट हा विदेशी पद्धतीचा ड्रेस कोड लागू केल्याने आश्चर्य वाटते.
२. ‘गणवेश ठराविक दुकानातून किंवा महाविद्यालयातूनच घ्यावा’, अशी अटही घालण्यात आली आहे.
३. संस्थेच्या अन्य शाळा, महाविद्यालयामध्ये ड्रेसकोड लागू नसतांना केवळ यावलला विदेशी ड्रेसकोड लागू करणे म्हणजे भारतीय संस्कृतीला विसंगत आहे.
४. लागू केलेला ड्रेसकोड ८ दिवसांत रहित करावा आणि याविषयी आम्हाला लेखी कळवावे, अन्यथा ‘भीम आर्मी’ संघटनेच्या वतीने महाविद्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल.