रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात असलेल्या ध्यानमंदिरातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि त्यांच्या पादुका यांच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातील त्यांच्या मुखमंडलाच्या बाजूला असलेली पांढरी प्रभावळ फिकट पिवळसर होणे
‘३१.१०.२०२२ या दिवशी ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना माझे लक्ष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे गेले. त्या वेळी ‘छायाचित्रातील त्यांच्या मुखमंडलाच्या बाजूला असलेली पांढरी प्रभावळ फिकट पिवळसर झाली आहे’, असे मला दिसले.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्या धुराप्रमाणे ध्यानमंदिरातील त्यांच्या पादुकांमधून धूर प्रक्षेपित होतांना दिसणे आणि पादुकांच्या अंगठ्याची हालचाल होतांना दिसून ‘पादुका म्हणजे प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चरणच आहेत’, याची अनुभूती येणे
२.११.२०२२ या दिवशी दुपारी १ वाजता मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. मधेमधे माझे लक्ष तेथे ठेवलेल्या गुरुपरंपरेतील गुरूंच्या छायाचित्रांकडे जात होते. (डावीकडून अनुक्रमे आद्य शंकराचार्यांच्या परंपरेतील चंद्रशेखरानंद, चंद्रशेखरानंद यांचे शिष्य श्री अनंतानंद साईश, श्री अनंतानंद साईश यांचे शिष्य प.पू. भक्तराज महाराज, प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य आणि उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज अन् प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य डॉ. आठवले यांची छायाचित्रे लावली आहेत.)
दुपारी २.४५ वाजता मला एके ठिकाणाहून धूर येतांना दिसला. तेव्हा मला वाटले, ‘उदबत्ती लावलेली दिसत नाही आणि उदबत्तीचा सुगंधही येत नाही, तर हा धूर कुठून येत आहे ? नीट पाहिल्यावर माझ्या लक्षात आले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पादुका असलेल्या लाकडी पेटीच्या वरच्या भागातून हा धूर येत आहे.’ लाकडी पेटीकडे पहात असतांना मला पादुकांच्या अंगठ्याची हालचाल जाणवली आणि अकस्मात् माझा भाव जागृत झाला. हा भाव पुष्कळ वेळ जागृत राहिला. त्या वेळी ‘या केवळ पादुका नसून प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चरण आहेत’, याची अनुभूती त्यांनीच दिली.
एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात त्यांनी त्यांच्या हातांच्या बोटांतून प्रक्षेपित होणारा धूर दाखवला होता (देहातून वायूतत्त्वाचे प्रक्षेपण होणे). त्या सत्संगात त्यांच्या पाठीतूनही होणार्या धुराचे प्रक्षेपण त्यांच्या कृपेने मला पहायला मिळाले होते. आज त्यांच्या पादुकांमधून बाहेर पडणारा धूर त्यांनीच दाखवला आणि ‘ते प्रत्यक्ष ध्यानमंदिरात उपस्थित आहेत’, याची अनुभूती दिली. ‘संतांचा स्थूलदेह आणि त्यांच्या पादुका एकच असतात’, याची अनुभूती त्यांनी मला दिली.
माझ्या मनात वरील विचार आल्यानंतर माझे लक्ष पुन्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे गेले. तेव्हा ‘ते माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला दिसले. त्यांच्या हास्याने मला पुष्कळ आश्वस्त केले. त्यानंतर मला पुन्हा त्यांच्या पादुका असलेल्या पेटीच्या वरच्या भागातून धूर येतांना दिसला.’
– सुश्री (कु.) राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |