प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव कांदळी (पुणे) येथे भावपूर्ण वातावरणात साजरा !
भक्तांकडून ‘हरि ॐ तत्सत्’चा गजर
जुन्नर (पुणे), १८ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘हरि ॐ तत्सत्’ या नामजपाच्या गजरात सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा महानिर्वाण उत्सव कार्तिक कृष्ण पक्ष नवमी, म्हणजेच १८ नोव्हेंबर या दिवशी कांदळी, ता. जुन्नर, जिल्हा पुणे येथील त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. ‘श्री रामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ यांच्या वतीने १७ अन् १८ नोव्हेंबर या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प.पू. बाबांचे छायाचित्र आणि त्यांच्या पादुका यांची पालखी !
१७ नोव्हेंबर या दिवशी प.पू. बाबांच्या समाधीची नित्य नैमित्तिक पूजा करण्यात आली. दुपारी भंडारा झाला. सायंकाळी ६ एकर परिसरापासून ते समाधी मंदिरापर्यंत प.पू. बाबांची प्रतिमा आणि पादुका यांची पालखी काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी समाधीची पूजा करण्यात आली. रात्री महाप्रसादानंतर नातेपुते येथील भजनी मंडळाची भजने झाली. बालकीर्तनकार ह.भ.प. कु. रेवा प्रशांत जोशी यांचे कीर्तन आणि पू. बाबांची भजने यांचा कार्यक्रम झाला.
प.पू. बाबांच्या समाधीची पूजा आणि अभिषेक !
१८ नोव्हेंबरला पहाटे ३.३० ते ४ दीपोत्सव झाला. त्यानंतर भक्तांनी ‘हरि ॐ तत्सत्’ हा नामजप केला. या दिवशी सकाळी प.पू. बाबांच्या समाधीवर चंदनाचा लेप लावून समाधीची पूजा करून अभिषेक करण्यात आला, तसेच भक्तांनी प.पू. बाबांची भजने म्हटली. दुपारी भंडार्यानंतर उत्सवाची सांगता झाली. याप्रसंगी प.पू. बाबांचे सुपुत्र पू. नंदू कसरेकर, डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले, पू. रामप्रभु महाराज, प.पू. बाबांचे भक्त श्री. शशिकांत ठुसे यांच्यासह अनेक भक्तगण उपस्थित होते.