विविध स्तरांवरील भारताची सुरक्षा आणि अन्य राष्ट्रांची भूमिका !
पाकिस्तान आणि चीन ही राष्ट्रे भारताची शत्रूराष्ट्रे आहेत. या दोन्ही राष्ट्रांकडून उघडउघड युद्ध केले जात नाही, तर ते आतंकवाद, आर्थिकदृष्ट्या हानी करणे या माध्यमातून त्रास देत असतात. या सर्वांशी भारत लढा देण्याविषयी कसा प्रयत्न करत आहे, याचा ऊहापोह या लेखात करत आहोत.
१. शस्त्रास्त्रे
१ अ. भारताकडून आफ्रिकेतील देशांसमवेत शस्त्रांविषयीचा करार ! : ‘एक्झिम बँके’च्या अहवालात ‘भारत आफ्रिकेतील देशांची शस्त्रांची आवश्यकता पूर्ण करू शकतो’, असे दिले आहे. यानंतर भारताने आफ्रिकेतील देशांना भेटी दिल्या. त्यात त्यांना पुरवण्यात येणार्या शस्त्रांच्या संदर्भात करार करण्यात आले. यामुळे देशात शस्त्रास्त्रांचे उद्योग वाढून रोजगारवृद्धी होईल.
१ आ. शत्रूच्या क्षेपणास्त्रापासून रक्षण करण्यासाठी भारताकडून ‘एडी-१’ नावाच्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात येणे : भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) एका ‘अँटी बॅलेस्टिक डिफेन्स यंत्रणे’विषयी (क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण यंत्रणेविषयी) संशोधन केले. त्यांनी इंटरसेप्टर ‘एडी-१’ नावाच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. शत्रूचे विमान किंवा क्षेपणास्त्रे यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी भारताने ‘एडी १’ हे क्षेपणास्त्र निर्माण केले आहे. ते ३०० ते ४०० किलोमीटरपर्यंत काम करू शकते. त्यामुळे शत्रूचे क्षेपणास्त्र भारतात पोचण्यापूर्वीच त्याला नष्ट करता येईल. अशा प्रकारचे संशोधन चालूच ठेवावे लागेल. पाकिस्तानातून येणार्या ड्रोनला नष्ट करण्यासाठीही भारत आता क्षेपणास्त्र बनवत आहे.
१ इ. शस्त्रास्त्रांमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताचे स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन ! : ‘यापुढे कुठलीही शस्त्रे आयात करायची नाहीत, तर स्वदेशातच बनवायची’, असे भारताने ठरवले आहे. भारत सरकारी आणि खासगी कारखाने यांना प्रोत्साहन देत आहे. यासाठी भारतीय सैन्याने या उद्योगांकडे ५ विविध शस्त्रांची मागणी केली आहे. त्यात ‘मॅन पॅक्ट हाय फ्रिक्वेंन्सी सॉफ्टवेअर डिझाईन’, ‘रेडिओ सिस्टीम’, ड्रोनला तोडणारी यंत्रणा, तोफखान्यातील बाँबना गाईड करून अधिक अचूक करणे आदी गोष्टी कारखान्यांना करण्यास
सांगितले आहेत.
२. भारतीय अर्थव्यवस्था
२ अ. भारताच्या अर्थव्यवस्थेची वेगाने वाटचाल : भारताची आयात-निर्यात वाढली आहे. त्यामुळे भारताचे ‘फॉरेन एक्सचेंज रिझर्व’ ६ अब्ज डॉलर्सने वाढले आहेत. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. त्या तुलनेत अन्य राष्ट्रांची अर्थव्यवस्था अतिशय खालच्या पातळीवर जाऊन पोचली आहे.
२ आ. स्वतःची अर्थव्यवस्था चांगली न करता आपापसांत लढणारा पाकिस्तान ! : काही दिवसांपूर्वी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आक्रमण करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्यावर ४ गोळ्या झाडण्यात आल्या; पण ते थोडक्यात वाचले. इम्रान खान हे शाहबाज शरीफ अणि पाक सैन्य यांना आव्हान देत आहेत. पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध चालू आहे. तेथील अर्थव्यवस्था अतिशय कठीण परिस्थितीतून जात असून ती परिस्थिती चांगली करण्याऐवजी ते एकमेकांमध्ये भांडण्यात गुंतलेले आहेत.
३. आतंकवाद
३ अ. सिलिंडर स्फोटात ठार झालेल्या तरुणाचा ‘इसिस’शी संबंध असल्याचे उघड झाल्याने तमिळनाडू सरकार प्रकरणाचे अन्वेषण करण्यास सिद्ध नसणे आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक असणे : तमिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये सिलिंडरच्या स्फोटात एका तरुणाचा मृत्यू झाला. तमिळनाडू सरकारने ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला; पण या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) लक्ष घातले. तेव्हा त्या तरुणाच्या वाहनात खिळे आणि बाँबसाठी लागणारे साहित्य आढळून आले. त्याचा ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचेही उघड झाले. याचा अर्थ मतपेटीच्या राजकारणासाठी तमिळनाडू सरकार गुन्हेगारांचे अन्वेषण करायला सिद्ध नव्हते. असाच प्रकार बंगालमध्येही होतो. तेथील सरकार अशा घटना लपवून ठेवते आणि एन्.आय.ए.ला तेथे येऊ देत नाही. हे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आहे.
३ आ. जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकच्या बाजूने येणार्या ३ आतंकवाद्यांना मारण्यात भारताच्या सैन्याला यश मिळाले.
३ इ. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या आतंकवादविरोधी समितीची भारतात बैठक घेतली जाणे आणि त्यात सर्व प्रतिनिधींना भारतातील आतंकवादी कारवायांविषयी माहिती दिली जाणे : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची जागतिक स्तरावर आतंकवादविरोधी समिती आहे. या समितीची नुकतीच एक बैठक भारताने प्रयत्नपूर्वक आपल्या देशात आयोजित केली. ही बैठक मुंबईतील हॉटेल ताजमध्ये झाली. तेथे आतंकवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी केलेल्या आक्रमणाविषयीची माहिती प्रतिनिधींनी जाणून घेतली. त्यानंतर त्यांना देहली येथे नेण्यात येऊन वर्ष २००१ मध्ये संसदेवर झालेल्या आक्रमणाची महिती देण्यात आली. या बैठकीत अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. यात ‘ऑनलाईन’ आतंकवादी वाढवणे, आतंकवाद्यांची ‘ऑनलाईन’ भरती, ‘ऑनलाईन’ आर्थिक पैसा जमवणे, ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तान पंजाबमध्ये अमली पदार्थाची तस्करी आदींविषयी चर्चा करण्यात आली.
मागील वर्षी पाकमधून अमली पदार्थ भरलेले १०० ड्रोन पंजाबमध्ये आले होते; पण भारतीय सुरक्षारक्षकांना ते पाडता आले नाहीत. त्यातील ८ पकडले गेले आणि अन्य ड्रोन साहित्य टाकून गायब झाले. पाकिस्तान पंजाबमध्ये खलिस्तान आतंकवादाऐवजी अफू-गांजा यांचा आतंकवाद वाढवत आहे. हेच भारताने या वेळी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
४. विश्वाचा शत्रू : चीन !
४ अ. जगभरातच चीनच्या विरोधात रोष असणे : चीनचे अन्य देशांत अनेक प्रकल्प चालू आहेत. या प्रकल्पांवर विविध आक्रमणे होतात. त्यामुळे त्यांच्या रक्षणासाठी चीन तेथे खासगी सुरक्षा आस्थापने पाठवणार आहे. यावरून जगात चीनच्या विरोधात किती रोष आहे, हे लक्षात येते.
४ आ. कॅनडाचा चीनला विरोध : चीन कॅनडाच्या भूमीतून ‘लिथियम्’ धातू काढत होता. त्यावर कॅनडाने बंदी घातली आहे; कारण लिथियम् हा अत्यंत क्लिष्ट धातू असून त्याला प्रचंड महत्त्व आहे.
४ इ. अमेरिकेकडूनही चीनला विरोध : चीनसमवेत ‘सेमीकंडक्टर’चा व्यापार अजिबात करायचा नाही, यासाठी अमेरिकेने नेदरलँडवर दबाव टाकला आहे. भारतही दबाव टाकत आहे. त्यामुळे चीनचे तंत्रज्ञान मागे पडेल आणि चीनची भारताच्या विरोधात काम करण्याची क्षमता हळूहळू अल्प होईल.
४ ई. चीनच्या विरोधात फ्रान्स भारताच्या पाठीशी : इंडो-पॅॅसिफिक सागरात चीनची जहाजे घुसखोरी करतात. त्याला भारत तोंड देण्याचा प्रयत्न करतो. भारताला साहाय्यासाठी फ्रान्स मोठ्या प्रमाणात त्यांची जहाजे इंडो-पॅसिफिकमध्ये तैनात करत आहे.
५. अमेरिकेची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला सहकार्य करण्याची सिद्धता
अमेरिकेने नुकतेच ‘यू.एस्. नॅशनल डिफेन्स स्ट्रॅॅटेजी २०२२’ जगासमोर मांडली. ही ‘स्ट्रॅटेजी’ भारताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. यातून अमेरिका भारताशी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती कळते. अमेरिका ही तंत्रज्ञानाची महाशक्ती आहे. तिच्याकडून भारताला तंत्रज्ञान मिळाले, तर देशाची आर्थिक प्रगतीसह सैनिकी प्रगतीही अधिक वेगाने होऊ शकते. अमेरिकेने असेही सांगितले की, चीन हा आमचा क्रमांक एकचा शत्रू आहे आणि आम्ही चीनच्या विरोधात काम करणारच.’
६. संरक्षण करार
भारताचे सैन्यदलप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी भारत आणि भूतान यांच्यात संरक्षण करार केला. प्रत्येक वर्षी भूतान आणि भारत यांचे सैन्य भूतानमध्ये सैन्याभ्यास करते.
७. प्रदूषण
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये (देहलीत) गेल्या २-३ आठवड्यांपासून प्रचंड धूर पसरला आहे. तेथील हवा विषारी झाली आहे. त्यामुळे लोक आजारी, तर काही मृत्यू पावत आहेत. याच काळात देहलीचे शेजारचे राज्य पंजाबमध्ये पराली (पंजाब राज्यातील शेतकरी पिकांचे अवशेष बाहेर काढण्यासाठी पराली जाळतात. पराली हा भातपिकाचा खालचा शिल्लक भाग आहे. पिकाचा वरचा भाग कापणी केल्यानंतर ज्याचा शेतकर्याला कोणताही उपयोग नसतो, त्याला पराली म्हणतात.) पेटवली जाते. त्यामुळे वातावणात धूर निर्माण होतो. हे टाळण्यासाठी पंजाबच्या शेतकर्यांना अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत; पण ते ऐकायला सिद्ध नाहीत. देहली सरकारमध्ये पंजाब सरकारला थांबवण्याचे धाडस नाही. त्यामुळे पुढील २ मास देहलीतील लोकांना हे सहन करावे लागणार आहे.
८. हवाई सुरक्षा
८ अ. हवाई दलासाठी ‘सी २९५’ एअरक्राफ्ट बनवण्याची भारताची योजना ! : ‘टाटा’ आस्थापनाचा ‘एअरबस’ या विमाने बनवणार्या आस्थापनाशी एक प्रचंड मोठा करार झाला आहे. भारतीय हवाई दलासाठी ‘सी २९५’ एअरक्राफ्ट हे विमान भारतात बनवले जाणार आहे. पूर्वी भारत सरकारने या आस्थापनाला भारताच्या ‘हिंदुस्थान एरोनॉॅटिक्स लि.’ समवेत हा प्रकल्प करण्यास सांगितला होता. जगातील अन्य कारखाने ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.’ समवेत हा प्रकल्प करण्यास सिद्ध नव्हते; कारण त्याची क्षमता अतिशय अल्प आहे. तसेच त्यांच्या समवेत काम करण्यास कोणताही देश सिद्ध नाही. ते टाटांसमवेत काम करायला सिद्ध आहेत.
आता ३-४ वर्षांत भारतात ४० विमाने बनतील. जमल्यास ही विमाने अन्य राष्ट्रांनाही निर्यात केली जातील. आपण सर्वच गोष्टी भारतात बनवू शकत नाही; परंतु जी उच्च दर्जाची आस्थापने आहेत, त्यांच्या साहाय्याने भारतात चांगली शस्त्रास्त्रे बनवता येतील. भारताकडून हाच प्रयत्न चालू आहे.
९. भारतीय मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारी करणे आवश्यक !
चीनच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आपण आपल्या मित्रराष्ट्रांचे साहाय्य घेतले पाहिजे. त्यामुळे भारताचा व्यय अल्प होईल आणि चीनच्या विरोधात कार्य करता येईल. शी जिनपिंग नुकतेच चीनचे सर्वेसर्वा झाले असून ते आयुष्यभर अध्यक्ष रहाणार आहेत. त्यामुळे चीन येणार्या काळात सैन्य आणि आक्रमकता वाढवेल. या पार्श्वभूमीवर इतर राष्ट्रांकडून भारताला कसे साहाय्य मिळत आहे, हे पाहूया.
जपान स्वतःच्या भूमीवर ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्र तैनात करत आहे. त्यामुळे चीनच्या नौदलाने आक्रमण केले, तर त्यांना प्रतिआक्रमण करता येईल. उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडातील देशांकडे विशेष सैन्य नाही, हे लक्षात घेऊन चीनच्या बोटी त्यांच्या हद्दीत जाऊन अवैध मासेमारी करतात. एका बेटावर चिनी बोटींची मासेमारी चालू होती. तेव्हा यू.एस्.ए.च्या तटरक्षक दलाच्या सैनिकांनी त्यांना हुसकावून लावले. भारताचे मच्छिमार हे केवळ भारताच्या किनारपट्टीवर मासेमारी करतात; परंतु चिनी मच्छिमार हे खोल समुद्रात जाऊन जेथे कुणी जात नाही, अशा ठिकाणी मासेमारी करतात. भारतीय मच्छिमारांनी अंदमान-निकोबार किंवा लक्षद्वीप बेटाजवळ जाऊन मासेमारी करायला हवी; पण ते करत नाहीत.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.