संयुक्त राष्ट्रांनी पर्यावरण कराराच्या प्रारूपामध्ये भारताचा प्रस्ताव समाविष्ट केला नाही !
नवी देहली – संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कराराच्या प्रारूपामध्ये भारताच्या प्रस्तावाला स्थान देण्यात आले नाही. सर्व जीवाश्म इंधने टप्प्याटप्प्याने अल्प करण्याविषयी भारताने या प्रस्तावात म्हटले होते. भारताच्या या प्रस्तावास युरोपीय महासंघासह अनेक देशांनी पाठिंबा दिला होता. या प्रारूपामध्ये भारताच्या प्रस्तावाचा समावेश न केल्याविषयी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या कराराविषयी अद्याप चर्चा आणि विचारविनिमय चालू असल्याने त्यावर आताच प्रतिक्रिया देता येणार नाही.
जागतिक पर्यावरणाच्या हितासाठी केवळ कोळसाच नव्हे, तर सर्व प्रकारच्या जीवाश्म इंधनांचा वापर टप्प्याटप्प्याने अल्प करण्याची आवश्यकता असून या प्रस्तावित करारासंबंधीची चर्चा त्याखेरीज पूर्ण होऊ नये, असे मत भारताने मांडले होते. ‘भारताचा हा प्रस्ताव चर्चेसाठी पुढे आल्यास आम्ही त्यास पाठिंबा देऊ’, असे युरोपीय महासंघाचे उपाध्यक्ष फ्रॅन्स टिमरमॅन्स यांनी म्हटले होते. अन्य काही देशांनीही भारताच्या भूमिकेची पाठराखण केली होती.