परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी हेमंत कानस्कर (वय १५ वर्षे) हिला ईश्वराला सर्वस्व अर्पण करण्याचे लक्षात आलेले महत्त्व !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे, ‘‘साधनेत सेवा करून ‘तन’, मनोलय करून ‘मन’ आणि गुरुकार्यासाठी ‘धन’ हे गुरुचरणी अर्पण केल्याने ‘तन, मन आणि धन यांचा त्याग होतो.’’ एकदा माझ्या मनात ‘साधनेच्या दृष्टीने तन, मन आणि धन यांचा त्याग करणे का आवश्यक आहे ?’, असा विचार आला. तेव्हा गुरुदेवांनी मला त्याचे पुढील उत्तर सुचवले, ‘देव आपल्याला जे काही देतो, ते पुष्कळ मोठे असते. जेव्हा आपण आपले सर्वस्व (तन, मन, धन, बुद्धी आणि अहं) देवाच्या चरणी अर्पण करतो आणि स्वतःची शरणागतभावाची झोळी त्याच्या पुढे पसरतो, तेव्हा खर्या अर्थाने तो जे काही आपल्याला देतो, ते आपण ग्रहण करू शकतो. जेव्हा आपण देवाच्या चरणी लहान बनून (अहं न्यून करून) जाऊ, तेव्हा तो आपल्याला साहाय्य करील, नाहीतर देव म्हणेल की, ‘असू दे, तुझ्याकडे तुझे सर्वकाही आहे ना, मग तू त्यातच सुखी रहा !’ त्यानंतर ‘ईश्वराकडून सर्व पाहिजे, तर आधी मला माझे सर्वस्व ईश्वराच्या चरणी अर्पण केले पाहिजे. मला साधनेतील आनंद मिळवून ईश्वरप्राप्ती करायची असेल, तर मला मायेतील सर्व गोष्टींचा त्याग करायचा आहे’, हे माझ्या लक्षात आले.
‘हे गुरुदेवा, आपण ही सूत्रे माझ्या लक्षात आणून दिलीत आणि त्यागाचे महत्त्व समजावून सांगितले’, यासाठी आपल्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), फोंडा, गोवा. (१६.६.२०२२)
साधकांनी सांगितलेले त्वरित कृतीत आणणारी कु. शर्वरी हेमंत कानस्कर (वय १५ वर्षे) !
१. मनमोकळेपणाने बोलता येण्यासाठी ‘प्रत्येकाच्या हृदयमंदिरात देव आहे, मला त्याच्याशी बोलून त्याच्याकडून शिकायचे आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न करून बोलणे
‘एकदा माझ्या सहसाधिकांनी मला ‘मी समष्टीत लवकर न मिसळता एकटी रहाते’, याची जाणीव करून दिली. माझ्यामध्ये मनमोकळेपणा येण्यासाठी ‘समष्टी हा माझा आरसा आहे. मला समष्टीत मनमोकळेपणाने बोलायचे आहे, म्हणजे आरश्यातील माझ्या प्रतिबिंबाशीच मोकळेपणाने बोलायचे आहे’, असा विचार गुरुदेवांनी मला सुचवला. ‘मला स्वतःशीच मोकळेपणाने बोलता येणार नाही का ?’, असा विचार केल्यावर माझे मन सकारात्मक झाले. त्यानंतर माझ्या मनाला ‘इतरांनी दिलेले दृष्टीकोन केवळ ऐकण्यापेक्षा मला ते कृतीतही आणायचे आहेत’, अशी जाणीव झाली आणि माझे कृतीच्या स्तरावर प्रयत्न होऊ लागले. आश्रमातील साधकांमध्ये ‘प्रेमभाव’ असल्यामुळे माझ्याकडून ‘प्रत्येकाच्या हृदयमंदिरात देव असून मला त्याच्याशी बोलून त्याच्याकडून शिकायचे आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न होऊ लागले.
२. सहसाधिकांशी मनमोकळेपणाने बोलल्यावर त्यांचे स्वभावदोष दिसल्यावर गुरुदेवांनी सूक्ष्मातून ‘योग्य काय असायला हवे ?’, हे लक्षात आणून देणे
सहसाधिकांच्या समवेत मनमोकळेपणाने बोलल्यावर ‘माझ्याकडून पुष्कळ वेळा इतरांचे स्वभावदोष पहाण्याचा भाग होतो’, असे माझ्या लक्षात आले. माझ्याकडून होत असलेली ही अयोग्य कृती लक्षात आल्यावर गुरुदेवांनी मला पुढील विचार सुचवले, ‘परात्पर गुरुदेव साधकांचे स्वभावदोष न बघता सगळ्यांवर समान प्रीती करतात. मग सहसाधिकांचे स्वभावदोष बघणारी मी कोण ?’ हे लक्षात आल्यावर परात्पर गुरुदेवांमुळे मला सहसाधिकांच्या माध्यमातून शिकायला मिळाले आणि मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागले.’
३. कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, मी असमर्थ आहे. आपणच माझ्याकडून वरील प्रयत्न करून घेतले. यासाठी आपल्या कोमल चरणी कृतज्ञता !’
– गुरुदेवांची, कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), फोंडा, गोवा. (१५.६.२०२२)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |