प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या पूर्णत्वाला पोचलेल्या उच्च कोटीच्या संतांचा लाभलेला सत्संग !
आज १८ नोव्हेंबर या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाणदिन आहे. त्या निमित्ताने…
प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्यासारख्या पूर्णत्वाला पोचलेल्या उच्च कोटीच्या संतांचा सत्संग पू. शिवाजी वटकर यांना लाभला. या सत्संगांमध्ये पू. वटकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती त्यांनी कृतज्ञताभावाने येथे दिल्या आहेत.
१. प.पू. बाबांचा गुरूंप्रती असलेला भाव
१ अ. गुरूंच्या पादुकांच्या रूपात गुरुच समवेत असल्याप्रमाणे प.पू. बाबा आनंदावस्थेत असणे : १३.७.१९९२ या दिवशी आम्ही प.पू. बाबांच्या समवेत मुंबई आणि ठाणे येथे वेगवेगळ्या भक्तांच्या घरी जात होतो. प.पू. बाबांच्या गुरूंच्या पादुका समवेत होत्या. प.पू. बाबांनी त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश यांच्या इंदूर आश्रमात पूजेसाठी ठेवलेल्या पादुका पुष्कळ वर्षांनी आणल्या होत्या. त्या वेळी ‘साक्षात् गुरुच आपल्या समवेत आहेत’, अशा आनंदावस्थेत प.पू. बाबा होते.
१ आ. प.पू. बाबांनी एका प्रसंगात ‘गुरु कसा ओळखावा’, हे सांगणे : प.पू. बाबांचे एक भक्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे यायचे. त्यांचे विचार वेगळे असायचे. ते ‘तांत्रिक पद्धतीने साधना करत होते’, असे मला वाटते. प.पू. बाबांच्या वर्ष १९९२ च्या मुंबई येथील गुरुपौर्णिमेच्या वेळी ते सेवा करण्यासाठी येत होते. ते इतरांमध्ये विकल्प पसरवायचे आणि स्वतःच गुरु असल्याचे भासवायचे. आम्हाला ते आवडत नव्हते; मात्र ते प.पू. बाबांचे ज्येष्ठ भक्त असल्याचे वाटल्यामुळे आम्ही त्यांना काही सांगू शकत नव्हतो. त्यानंतर एकदा आम्ही सर्व एकत्र बसलो असतांना प.पू. बाबा त्यांच्याकडे पाहून मला म्हणाले, ‘‘गुरु कसा ओळखावा, तर डोक्यावरून हात फिरवून फसवणारा !’’ प.पू. बाबांनी या त्यांच्या वाक्याने मला सत्याची प्रचीती देऊन खरा गुरु आणि भोंदू गुरु कसे ओळखावे, हे शिकवले. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील माझी श्रद्धा वाढत गेली.
१ इ. देहावर प्रेम न करता तत्त्वावर प्रेम करण्यास सांगणे : एकदा आम्ही प.पू. बाबांच्या एका भक्ताच्या घरी गेलो होतो. तेथून निघतांना आम्ही त्यांच्या इमारतीमधून खाली उतरलो. गाडीत बसण्यासाठी प.पू. बाबा रस्त्यात उभे होते. त्या वेळी त्या भक्ताने रस्त्यावरच प.पू. बाबांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, ‘‘नाटक का करतोस ! देहावर प्रेम करू नका. नामस्मरणावर आणि माझ्या तत्त्वावर प्रेम करा.’’
१ ई. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कोणत्या नावाने संबोधावे ?’, असे विचारल्यावर द्रष्ट्या प.पू. बाबांनी आता ‘डॉक्टर’ असेच म्हणा, वेळ आल्यावर सांगीन’, असे सांगणे आणि आता ती वेळ आली असल्याने प.पू. बाबांनीच महर्षींना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले अवतारत्व प्रकट करून ते ‘श्रीमन्नारायण’ असल्याचे सांगितले आहे’, असे वाटणे : संत किंवा गुरु यांना संप्रदायानुसार वेगवेगळ्या बिरुदावली आणि पदे लावतात. आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केवळ ‘‘डॉक्टर’’ असे संबोधत होतो. त्यामुळे २०.९.१९९२ या दिवशी मी प.पू. बाबांना विचारले, ‘‘डॉ. आठवले यांना ‘डॉक्टर’ असे म्हणण्याऐवजी काय म्हणावे ?’’ ते म्हणाले, ‘‘आता ‘डॉक्टर’ असेच म्हणा. वेळ आल्यावर मी सांगेन.’’ आता ती वेळ आली असल्याने ‘प.पू. बाबांनीच महर्षींना सांगून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व उघड केले आहे’, असे मला वाटते. त्यामुळे आता महर्षींनी सांगितले आहे की, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले विष्णूचा अवतार आहेत. ते साक्षात् विष्णुस्वरूप श्रीमन्नारायण श्री श्री जयंत बाळाजी आठवले आहेत. ते जयंत अवतार आहेत. ते मोक्षगुरु, परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत.’ (आणि आता तर महर्षींनी त्यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’ असे म्हणावयास सांगितले आहे.)
२. प.पू. बाबांचे विचारधन !
बाबांचे काही विचारधन ‘जे ग्रंथात आले नाही’, असे वाटते, ते येथे देत आहे.
२ अ. शरीर खोटे असल्याने खोट्या शरिराचे लोक खरे कसे बोलतील ? : प.पू. बाबांची एक स्त्री भक्त कीर्तनकार होती. ‘मला लग्न करावयाचे नाही’, असे ती म्हणत होती. त्या वेळी प.पू. बाबा तिला म्हणाले, ‘‘जमून आले आणि प्रारब्धात असेल, तर लग्न करावे. मी नाही का लग्न केले, संसार केला. ६ मुले झाली, तरी लोक मला मानतात; म्हणून ‘लोक काय म्हणतात’, याकडे लक्ष देऊ नका. लोक म्हणजे आपण नाही; कारण लोक आपणासारखे बोलणार नाहीत. शरीर खोटे आहे. खोट्या शरिराचे लोक खरे कसे बोलतील ?’’
२ आ. लहान माणसांनी लहान म्हणून रहाणे, यात त्यांचे मोठेपणच आहे !’ : वर्ष १९९४ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांनी पुढील प्रसंग सांगितला. एकदा ते (व्यवसायाने चांभार असलेल्या) एका भक्ताच्या घरी गेल्यावर चामड्याशेजारी बसून जेवले. सोबतच्या काही भक्तांना घाण वाटली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपल्या शरिरावरची कातडी उघडून पहा, म्हणजे समजेल की, आपण स्वतःच एक नंबरचे भंगी आहोत. सकाळी उठून आपण काय करतो ? उलट ‘या लहान माणसांनी लहान म्हणून रहाणे’, यात त्यांचे मोठेपणच आहे.’’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद. (२३.७.२०१७)
प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण१. एकच संकल्प करा की, विकल्प मनात आणावयाचा नाही. २. अध्यात्मात दुसर्याच्या भल्याचा विचार करावयाचा असतो. ३. उन्नतांचे सांगणे ऐकणे, ही एक साधनाच आहे, उदा. प.पू. धांडे शास्त्री यांनी प.पू. बाबांना केळ्याची साल खायला दिली आणि स्वत: केळे खाल्ले. ४. सर्व करता आले पाहिजे, उदा. श्रीकृष्णाने यज्ञाच्या वेळी उष्ट्या पत्रावळी उचलल्या. प.पू. बाबांनी स्वतःच्या अमृत महोत्सवाच्या प्रसंगी व्यासपिठावर (स्टेजवर) शेजारी बसलेल्या संतांना वारा घातला. सेवा करण्यातच आनंद वाटला पाहिजे. ५. संतांसारखे सहज वागणे जमले पाहिजे. ६. लोक मला म्हणतात की, तुम्ही सर्वज्ञ आहात; पण प्रत्यक्षात वेळ आली की, ते तसे वागत नाहीत. |
भक्तराजबाबा असती आनंदाची मूर्ती ।कांदळी येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधी मंदिराची काही छायाचित्रे पू. शिवाजी वटकर यांनी पाठवल्यावर मला पुढील कविता सुचली. भक्तराजबाबा असती आनंदाची मूर्ती । जगभर पसरली त्यांची कीर्ती । आज आली हो आनंदाला भरती । माथा ठेवता त्यांच्या समाधी वरती । अशी आहे हो बाबांची मूर्ती । टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले – श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.५.२०२१) |
‘सगुण-निर्गुण नाही भेदाभेद !’, हे शिकायला मिळणे
‘सगुण-निर्गुण नाही भेदाभेद !’, ही प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांच्या भजनातील एक ओळ आहे. या वाक्याचा उलगडा मला देवाने पुढील प्रकारे करून दिला.
देवाने वाक्य सुचवले, ‘सगुणाच्या आकृतीबंधात जेव्हा निर्गुण बंदिस्त होते, तेव्हाच त्याचे महत्त्व आपल्याला कळते.’ याचे कारण म्हणजे अमर्याद असणारे निर्गुण खरेतर आपल्याला कळतच नाही, तसेच त्याची अनुभूतीही घेणे फार अवघड आहे. जसे ईश्वर आपल्याला कळत नाही आणि त्याची अनुभूतीही आपल्याला घेता येत नाही; पण ईश्वर जेव्हा ‘श्रीकृष्ण’, ‘श्रीराम’ अशा देवतांच्या रूपात येतो, तेव्हा तो आपल्याला कळू शकतो. याचे कारण म्हणजे तेव्हा ईश्वराने रूप धारण केलेले असते. तो आकृतीबंधात, म्हणजे सगुणात बंदिस्त झालेला असतो. यावरून लक्षात येते, ‘सगुणामुळेच निर्गुणाचे महत्त्व कळते.’
एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एक प्रयोग करायला सांगितला. त्यामध्ये त्यांनी ‘प्रथम देवघरातील देवतांकडे बघून काय वाटते ?’, हे बघा. त्यानंतर ‘देवघरातील देवतांच्या वरील पोकळीकडे बघून काय वाटते ?’, हे बघा आणि ‘या दोन्हींपैकी सर्वांत अधिक चांगले कोणाकडे बघून वाटते, ते सांगा ?’, असे विचारले. याचे उत्तर ‘देवघरातील देवतांच्या वरील निर्गुण पोकळीकडे बघून शांत वाटत असल्याने अधिक चांगले वाटते’, असे मिळाले. खरेतर देवतांच्या अस्तित्वामुळेच वरील निर्गुण पोकळीकडे बघून अधिक चांगले वाटत होते. देवघरात देवताच नसत्या, तर देवघर भकास वाटले असते.
यावरून लक्षात येते, ‘सगुणामुळे निर्गुणाचे महत्त्व कळते आणि निर्गुणामुळे सगुणाचे !’ त्यामुळेच ‘सगुण-निर्गुण नाही भेदाभेद !’, असे प.पू. बाबा म्हणत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच हे विचारमंथन करवून घेतले. तेच बुद्धीला चालना देतात आणि तेच शिकवतात. याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.३.२०२२)