कंबरेचे स्नायू दुखावले गेल्याने हालचाल करतांना कंबर पुष्कळ दुखणे आणि भौतिकोपचार तज्ञाने सांगितल्यानुसार नियमितपणे केलेल्या व्यायामामुळे कंबरेचे दुखणे ८ दिवसांत उणावणे अन् नियमितपणे व्यायाम करण्याचे महत्त्व लक्षात येणे
‘१८.१०.२०२१ या दिवशी घरातील साहित्य हलवतांना माझे कंबरेचे स्नायू दुखावले गेले. त्यानंतर दुसर्या दिवसापासून माझ्या कंबरेच्या दुखण्यात वाढ झाली. बसतांना, उठतांना आणि झोपेत कूस पालटतांना माझी कंबर पुष्कळ दुखायची. त्यामुळे मला नेहमीच्या दैनंदिन कृती करणेही शक्य होत नव्हते. एका जागी ५ मिनिटे बसून उठल्यानंतरही माझी कंबर आखडायची आणि नंतर काही मिनिटे मला ताठ उभे रहाता यायचे नाही. कंबरेच्या स्नायूंना विश्रांती देणे, म्हणजे त्यांच्यावर ताण येईल, अशा हालचाली न करणे, असे करूनही माझे दुखणे फारसे उणावले नाही.
२९.१०.२०२१ या दिवसापासून मी भौतिकोपचार तज्ञाने (फिजिओथेरपिस्टने) सांगितलेले व्यायाम करू लागलो. आरंभीचे काही दिवस मी नियमितपणे व्यायाम करत नसल्याने मला विशेष लाभ जाणवत नव्हता.
त्यानंतर मी भौतिकोपचार तज्ञाने सांगितल्याप्रमाणे गांभीर्याने आणि नियमितपणे व्यायाम करू लागलो. त्यामुळे पुढील ३ – ४ दिवसांत माझे दुखणे जवळजवळ ९० टक्के इतक्या प्रमाणात उणावले. ७.११.२०२१ या दिवशी मी एका जागी १५ ते २० मिनिटे बसून उठल्यावरही माझी कंबर आखडली नाही.
या प्रसंगातून ‘योग्य व्यायाम नियमितपणे करण्याचे महत्त्व’ माझ्या लक्षात आले.’
– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, सनातन संकुल, नवीन पनवेल. (१०.११.२०२१)