प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करावे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील कुंभ महोत्सव !
जळगाव – जिल्ह्यातील गोद्री येथील अखिल भारतीय ‘हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३’ साठी देशभरातून अनुमाने ५० ते ६० सहस्र भाविक अपेक्षित आहेत. त्यामुळे कार्यक्रमस्थळी पायाभूत सुविधा चोख असाव्यात. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करावे. या कार्यक्रमाच्या नियोजनातील सर्व विभागांतील कामांच्या समन्वयासाठी जिल्ह्याचे पालक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून भाविकांना चांगला अनुभव घेता आला पाहिजे, अशा सूचना सर्व यंत्रणांनी द्याव्यात. सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, ऊर्जा विभाग, ग्रामविकास विभाग, गृह विभाग यांनी त्यांना दिलेले उत्तरदायित्व चोखपणे पार पाडावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे होणार्या ‘अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३’विषयी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पूर्वसिद्धतेच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.