वारणा-कोडोली (कोल्हापूर) येथे ‘संजीवन सभे’च्या नावाखाली चालू असलेला कार्यक्रम बंद करावा !
|
कोल्हापूर – कोडोलीतील पांढरा बंगला मैदानावर १४ नोव्हेंबरपासून ‘संजीवन सभा शांती महोत्सव’ हा कार्यक्रम विनाअनुमती चालू आहे. कोडोली पोलीस कार्यालयाकडे ‘कोडोली ख्रिश्चन प्रोसबेटेरियन चर्च कोडोली’ या संस्थेच्या ‘लेटरपॅड’वर कार्यक्रमाची अनुमती ज्यांनी मागितली आहे, ते या संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य नाहीत. हे विश्वस्त मंडळ न्यायालयाने विसर्जित केले आहे. त्यामुळे अशा वेळी संस्थेची कागदपत्रे आणि इतर मालमत्ता यांचा वापर करणे गुन्हा आहे. तरी या कार्यक्रमामुळे ग्रामीण, गरीब, अशिक्षित हिंदु कुटुंबांमध्ये भक्तीच्या नावाखाली धर्मांतराचे षड्यंत्र चालवले जाते. त्यामुळे याचा विचार करून संयोजकांवर गुन्हे नोंद करून कार्यक्रम त्वरित बंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले.
या संदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकार्यांनाही निवेदन देण्यात आले असून त्यातील सादरकर्ते ‘इव्हजलिस्ट’ (देवाचे अभिषिक्त प्रवक्ते) दीपक होळकर हे अमेरिकेवरून कोणत्या कारणासाठी आले आहेत, याचे अन्वेषण करून त्यांचे पारपत्र पडताळण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या प्रसंगी सर्वश्री चंद्रकांत शिंदे, स्वप्नील गायकवाड, अभिजित पाटील, विनायक पाटील, अनिरुद्ध कोल्हापुरे, शशांक देशपांडे यांसह अन्य उपस्थित होते. ‘निवेदन दिल्यानंतर कार्यक्रमाचे स्वरूप पालटून गाण्याचा कार्यक्रम करण्यात आला आहे आणि पोलीस प्रशासनाची अनुमती १६ नोव्हेंबरला घेण्यात आली आहे’, असे समजते.