पुणे येथील मार्केट यार्ड गोळीबार प्रकरणी ७ आरोपींना अटक !
पुणे – येथील मार्केट यार्ड परिसरात १२ नोव्हेंबरला भरदिवसा अंगडीया या व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून गोळीबार करत २८ लाख रुपयांची रोकड लुटणार्या चोरांना पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अवघ्या २ दिवसांतच अटक केली आहे. या घटनेत एकूण ११ आरोपींचा समावेश होता. यापैकी ७ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींवर याआधीही विविध गुन्हे नोंद आहेत. विविध गुन्ह्यांमध्ये यातील आरोपी हे येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होते. आरोपींनी दुसर्या गुन्ह्यात कारागृहात असतांनाच जानेवारी मासात अशा प्रकारे गुन्हा करण्याचा कट रचला होता, असे अन्वेषणात उघडकीस आले आहे.