ऑक्टोबर मासात खासगी बसगाड्यांकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने १ लाख ८६ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला !
दीपावलीच्या कालावधीत खासगी बसगाड्यांकडून भाडेवाढीच्या निमित्ताने जी लूट होते, त्याची तक्रार नोंदवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला होता. या क्रमांकावर ‘शून्य’ तक्रारी नोंद झाल्या, असे कार्यालयातील संबंधित अधिकार्यांनी सांगितले. |
सांगली, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – ऑक्टोबर मासात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगली जिल्ह्यात ‘खासगी बस पडताळणी’ मोहिमेच्या अंतर्गत २३७ वाहनांची पडताळणी केली असता त्यातील ७६ वाहने दोषी आढळली. या वाहनचालकांकडून १ लाख ८६ सहस्र ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या प्रकरणी ७ लाख ७३ सहस्र ७०८ रुपये करवसुली करण्यात आली असून एकूण वसुली ९ लाख ६० सहस्र २०८ रुपये एवढी आहे. ७६ दोषी वाहनांपैकी ५१ प्रकरणे निकाली काढली असून एकाही खासगी बसची अनुज्ञप्ती निलंबित केलेली नाही, तसेच एकाही बसचा परवाना निलंबित केलेला नाही, अशी माहिती सांगली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून देण्यात आली.