अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचा मंत्रालयावर मोर्चा !
मुंबई – कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया देतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अश्लील शिवी दिली होती. याच्या निषेधार्थ १५ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. या वेळी पोलिसांनी मोर्च्यातील सहभागी महिलांना कह्यात घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या येथून महिला कार्यकर्त्यांनी मोर्च्याला प्रारंभ केला. मोर्चा मध्येच अडवून पोलिसांनी महिलांना कह्यात घेतले. त्यानंतर काही वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य महिला कार्यकर्त्या मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आल्या.