‘युटीएस् ॲप’द्वारे आता ५ किलोमीटर अंतरापर्यंतचे तिकीट घेण्याची सुविधा !
(‘युटीएस् ॲप’ – मुंबई रेल्वे प्रशासनाने लोकलच्या प्रवाशांसाठी ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी सिद्ध केलेले ॲप)
मुंबई – रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ‘यूटीएस् मोबाईल ॲप’द्वारे तिकीट आरक्षित करण्यासाठीच्या अंतराच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणून उपनगरीय तिकिटांसाठी अंतराची मर्यादा २ किलोमीटरवरून ५ किलोमीटर करण्यात आली आहे, तर गैर-उपनगरीय तिकिटांसाठी अंतराची मर्यादा ५ किलोमीटरवरून २० किलोमीटर करण्यात आली आहे. यामुळे लोकलने प्रवास करणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. रेल्वेच्या तिकीट खिडकीवर लांबच लांब रांगा लावण्यापेक्षा लोक ऑनलाईन तिकीट आरक्षित करतात. यासाठी या ‘मोबाईल ॲप’चा वापर केला जातो; मात्र कोरोना कालावधीत बंद असलेल्या आणि पुढे टप्प्याटप्प्याने चालू केलेल्या या ॲपलाही काही मर्यादा होत्या. त्यामुळे बहुतेक वेळा तिकीट आरक्षित करतांना प्रवाशांना अडथळे येत होते.