(म्हणे) ‘राम, कृष्ण यांनी आमच्या जातीवर अन्याय केला !’
|
बेतिया (बिहार) – निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांच्या बिहारमधील जनसुराज्य यात्रेच्या वेळी येथे एका सभेमध्ये गोरख महतो या निवृत्त शिक्षकाने ‘राम, द्रोणाचार्य, कृष्ण आणि विश्वकर्मा यांनी आमच्या जातीवर अन्याय केला आहे’, असे विधान केले. या विधानानंतर लगेचच त्यांना मंचावरून खाली उतरवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या घटनेवरून विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली आहे.
बजरंग दलाचे जिल्हामंत्री रमन गुप्ता म्हणाले, ‘‘प्रशांत किशोर कोणत्या प्रकारचे राजकारण करू इच्छित आहेत ? देवतांची टिंगल करून ते राजकारण करू पहात आहेत का ? ते जातीच्या आधारे ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण राबवून राजकारण करू इच्छित आहेत का ? अशा राजकारणाला आम्ही विरोध करू. अशा प्रकारचे कृत्य आम्ही स्वीकारणार नाही.’’
संपादकीय भूमिकाप्रशांत किशोर यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे अन्यथा ‘त्यांचे या विधानाला समर्थन आहे’, असे समजून हिंदूंनी त्यांना वैध मार्गाने विरोध केला पाहिजे ! |