मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील आरोग्याविषयीचे धक्कादायक वास्तव उघड !
८ सहस्र विद्यार्थ्यांना रक्तदाब, तर ५ सहस्रांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मधुमेह !
मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील ८ सहस्र विद्यार्थ्यांना रक्तदाब, तर ५ सहस्रांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मधुमेह झाला आहे. शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य पडताळणी केल्यावर ही आकडेवारी उघड झाली. ‘पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घ्यावी, त्यांना सकस-संतुलित आहार द्यावा, तसेच व्यायामाला प्राधान्य द्यावे’, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रक्तदाब आणि मधुमेह यांचा त्रास वाढण्यास चॉकलेट, स्नॅक्स, फास्ट फूड, जंक फूड यांचे अतीसेवन, तसेच भ्रमणभाष, संगणक, भ्रमणसंगणक अन् दूरचित्रवाणी संच पहाण्याची सवय कारणीभूत आहे, असे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्राथमिक सर्वेक्षण अहवालानुसार, मुंबईतील १८ ते ६९ वर्षे या वयोगटातील ३४ टक्के लोकांना उच्च रक्तदाब असून २० टक्के लोकांना मधुमेह आहे. उच्च रक्तदाबाची लक्षणे असलेल्या ३४ टक्के नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन आहारात ९ ग्रॅम मीठ वापरले आहे. प्रत्यक्षात प्रतिदिनच्या आहारात ५ ग्रॅम मीठ पुरेसे असते, असे निरीक्षण संघटनेने नोंदवले आहे.
संपादकीय भूमिकापाश्चात्त्य जीवनशैलीचा दुष्परिणाम जाणा ! |