पुणे येथील ८ वर्षीय मुलाचा ५ मिनिटे ५१ सेकंदांत शिवतांडव आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्रपठणाचा विश्वविक्रम !
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
पुणे – अवघ्या ५ मिनिटे आणि ५१ सेकंदात शिवतांडव आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्रपठणाचा विश्वविक्रम करणार्या पुणे येथील ८ वर्षीय संस्कार ऋषिकेश खटावकर याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरव केला. मंत्रालयात झालेल्या भेटीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी संस्कारचा सत्कार करत त्याच्या विक्रमाचे कौतुक केले. या वेळी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्यासह संस्कारचे वडील ऋषिकेश खटावकर आदी उपस्थित होते. शिवाजीनगर येथील ‘मॉडर्न प्री-प्रायमरी स्कूल’मध्ये तिसरी इयत्तेमध्ये शिकणार्या संस्कारने नुकतीच ही विक्रमी कामगिरी केली. त्याच्या या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन’ यामध्ये घेण्यात आली आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र ३ मिनिटे ७ सेकंदांत पठण करत त्याने केरळच्या मुलीचा ३ मिनिटे ४४ सेकंदांचा विक्रम मोडला.
या वेळी ऋषिकेश खटावकर यांनी सांगितले की, महिषासुरमर्दिनी स्तोत्र आणि शिवतांडव स्तोत्र उच्चारण्यास कठीण आहेत; मात्र आम्ही गेली ३ वर्षे सिद्धता करत होतो. कोरोनाकाळात शाळा बंद असल्यामुळे आम्हाला अधिक वेळ मिळाला. त्याची आई मोनिका खटावकर यांनीही त्याचे चांगले पाठांतर करून घेतले.