आळंदीमध्ये कार्तिकी यात्रा आणि ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा यांची प्रशासनाकडून सिद्धता !
आळंदी (पुणे) – कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा १७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने सोडून इतर जड वाहने यांना १७ ते २३ नोव्हेंबरपर्यंत आळंदी परिसरामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा उपयोग करण्याचे आवाहन आळंदी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. २० नोव्हेंबर या दिवशी कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) आणि २२ नोव्हेंबर या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून सेवा सुविधा आणि नियोजन करण्यात आले आहे.
एस्.आर्.पी.एफ्.च्या ३ तुकड्या, एन्.डी.आर्.एफ्.च्या २ तुकड्या आणि बी.डी.डी.एस्.ची २ पथके साहाय्यासाठी बोलवण्यात आली आहेत. यात्रेच्या परिसरात मंदिर आणि आळंदी शहर, तसेच परिसरात २३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्याद्वारे यात्रेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.