परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी घडणारा वृक्ष, लता, वेली आणि पक्षी यांचा भावसंवाद !
‘२९.४.२०२२ या दिवशी पहाटे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरात परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) खोलीच्या बाहेर पक्ष्यांचा गुंजारव ऐकून आणि वृक्ष, लता, वेली यांची आनंदी अवस्था पाहून माझ्या मनाने जणू त्यांचा भावसंवाद ऐकला अन् माझे मन आनंदून गेले. तो अनुभव शब्दांत मांडण्याचा प्रयत्न गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वाने प्रफुल्लित आणि आनंदी झालेली सृष्टी अनुभवता येणारी ‘रम्य ती पहाट !’
रम्य अशी पहाट ! सूर्यकिरण जग उजळून टाकण्याच्या प्रयत्नात असतांना, सृष्टी घोर अंधकारातून उषःकालाकडे मार्गक्रमण करत असतांना पक्षी मंजुळ गुंजारव करत आहेत. पक्षी गुंजन कुणासाठी बरे करत आहेत ? विष्णुस्वरूप गुरुमाऊलीसाठी ! परात्पर गुरु डॉ. आठवले रहात असलेल्या खोलीच्या खिडकीतून समोर दिसणार्या डोंगरावर असलेल्या वनराईत विविध पक्षी गुंजारव करत आहेत.
झाडे, लता, वेली प्रफुल्लित आणि आनंदी आहेत. प्रत्यक्ष विष्णुस्वरूप गुरुमाऊली त्यांना खिडकीतून प्रतिदिन न्याहाळते. त्यामुळे ते आनंदविभोर झाले आहेत. आज प्रत्यक्ष परमेश्वराची दृष्टी त्यांच्यावर पडत आहे; म्हणून त्यांना बहर आला आहे. आजपर्यंत कधी न बहरलेली झाडे हिरवेगार शालू नेसून नटली आहेत. झाडे फुले आणि फळे यांनी लगडली आहेत. परमेश्वर त्यांच्याकडे बघून त्यांच्यावर कृपा करतो. प्रतिदिन नवीन नवीन निरीक्षणे सांगतो आणि ती सृष्टी आनंद, परमानंद घेते, परमेश्वराच्या प्रत्यक्ष दर्शनाचा !
२. झाडे, लता, वेली आणि पक्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी साधत असलेला भावसंवाद !
झाडे, लता, वेली आणि पक्षी त्या परमेश्वराला ‘कृपा कर !’ तुझे स्तवन करण्यासाठी आम्ही गात आहोत. कृपा करी हे वैष्णवा, कृपा कर ! तू सृष्टीचा पालक आहेस. कृपा कर !’, अशी साद घालत आहेत.
प्रत्येक पक्षी जणू स्पर्धा असल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीच्या खिडकीसमोर येऊन कला सादर करत आहे. पक्षी म्हणत आहेत, ‘वैकुंठात आम्ही कला सादर करू कि नाही ?’, हे ठाऊक नाही; परंतु येथे तुझ्या खोलीच्या बाहेर येऊन आम्ही कला सादर करत आहोत. मंजुळ गुंजारव करत आहोत. आम्ही तुझ्या कृपेसाठी आतुरलेले आहोत. हे जगदीश्वरा, हे परमेश्वरा, तू आम्हाला पावन केलेस. तू या खोलीत रहायला आलास. आमच्यावर तुझी दृष्टी पडू लागली आणि आम्ही धन्य धन्य झालो. आम्हाला ‘पुढचा जन्म कोणता मिळेल ?’, हे ठाऊक नाही. आमच्या या जन्मात तुझ्या आमच्यावरील प्रेमळ दृष्टीक्षेपामुळे आम्ही कृतकृत्य झालो आहोत. संपूर्ण सृष्टीला कसे जपायचे ? हे तुलाच ठाऊक आहे. हे परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक आहे.’
परमेश्वराने माझ्यासारख्या लहान जिवाला हे क्षण अनुभवण्यास दिले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, परात्पर गुरु डॉक्टर, मी कृतज्ञ आहे ! कृतज्ञ आहे !’
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |