भारताचा शत्रू भ्रष्टाचार !
‘पाण्यामध्ये असणारा मासा पाणी कधी पितो, हे आपण ओळखू शकत नाही, तसेच सरकारी अधिकारी भ्रष्टाचार कधी करतात, हे आपण ओळखू शकत नाही’, असे आर्य चाणक्य यांनी भ्रष्टाचाराविषयी लिहून ठेवले आहे. साधारण २ सहस्र वर्षांपूर्वीच्या स्थितीवरून त्यांनी हे लिहिले आहे. आजच्या स्थितीशी हे जोडून पाहिले, तर आज कोण ? कधी ? आणि कसा भ्रष्टाचार करत आहे ? हे जगजाहीर आहे. त्यामुळे ही भ्रष्टाचार्यांनी केलेली ‘प्रगती’च म्हणावी लागेल. हे सांगायचा उद्देश म्हणजे जे जगजाहीर आहे, तेच भारताच्या सर्वाेच्च न्यायालयालाही म्हणावे लागले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले, ‘‘भ्रष्टाचारी लोक देशाची वाट लावत आहेत. प्रत्येक सरकारी कार्यालयात काय चालू असते ? ते तुम्ही बघता. अशा लोकांवर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कडक कारवाई होत नाही. त्यामुळे ते त्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकार चालूच ठेवतात. हेच भ्रष्टाचाराचे मूळ आहे.’’ न्यायालयाचे हे विधान किती वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केले ? आणि किती जणांनी ते वाचले ? याला महत्त्व अल्प आहे; कारण यात नवीन काही नाही. हे सर्वांनाच ठाऊक आहे. प्रश्न असा आहे की, ही परिस्थिती कोण ? आणि कशी पालटणार ? मगधचा राजा धनानंद याच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळेच आर्य चाणक्यांनी त्याची सत्ता उलथवून टाकली. जगात आज अनेक सरकारे भ्रष्टाचारामुळे सत्तेतून पायउतार झाली आहेत आणि पुढेही होत रहातील; मात्र भ्रष्टाचार काही संपणार नाही. याचे कारण ‘मानवाचा स्वभाव’ हे आहे. मानवी स्वभाव त्यागी, निरपेक्ष आणि विरक्त असेल आणि अशा स्वभावाच्या व्यक्ती सत्तेवर असतील, तरच भ्रष्टाचारविरहित राज्यकारभार होऊ शकेल; मात्र अशा मानवी स्वभावाची व्यक्ती असणे दुर्मिळ आहे. पूर्वी होऊन गेलेल्या अशा दुर्मिळ व्यक्तींची नावेही सहज कुणाला आठवणार नाहीत. गेल्या काही शतकांमध्ये अशा वृत्तीचा शासनकर्ता होऊन गेला आहे, असे आपल्याला सांगता येणार नाही. ‘पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा’, हेच समीकरण आज जगभरात चालू आहे. यामुळे अनेक देशांची अधोगती झाली आहे किंवा होत आहे, यात अतिशयोक्ती नाही. यावर परिणामकारक उपाय काढून ते रोखण्याचा प्रयत्न जगभरात होतो; मात्र भ्रष्टाचारी त्यापेक्षा अधिक ‘पुढारलेले’ असल्याने ते याही स्थितीत भ्रष्टाचार करतातच, हे दिसून येते. सर्वाेच्च न्यायालयाने याच भ्रष्टाचारामुळे भारताची वाट लागल्याचे म्हटले, तरी त्यावर काय करू शकतो ? किंवा कुणी काय करावे ? असा आदेश दिलेला नाही, हे लक्षात घ्यायला हवे. न्यायालयालाही याविषयी मर्यादा आहेत. ‘न्यायालयातही भ्रष्टाचार चालतो’, असे आरोप होत असतात. त्यामुळे नियम, कायदे, लक्ष ठेवणे आदी उपाययोजना केल्या, तरी मूळ प्रकृती आणि वृत्ती पालटल्यासच भ्रष्टाचार रोखता येऊ शकतो.
संस्कारांची आवश्यकता !
‘यथा राजा तथा प्रजा’ अशी एक म्हण प्रचलित आहे. या म्हणीनुसार जर राजा स्वतः विरक्त, त्यागी आणि निरपेक्ष असेल, तर प्रजाही तशी होऊ शकते. याचे उत्तम आणि जवळपास एकमात्र असलेले उदाहरण म्हणजे भगवान श्रीराम होय ! त्यामुळेच रामराज्याची अपेक्षा आजही केली जाते; मात्र त्यासाठी राजा राम असणे आवश्यक आहे. असे राजे म्हणजे शासनकर्ते आणण्यासाठी जनतेवर त्या दृष्टीने संस्कार करणे आवश्यक आहे. तसे संस्कार आज होतांना दिसत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. हे संस्कार करण्याचे दायित्व पालकांचे आणि शिक्षक यांचे आहे; मात्र ते सध्या होतांना कुठेच दिसत नाही. सरकारी किंवा कुठल्याही मोठ्या पदावर असणारा आपला मुलगा, आपला पती, आपले वडील हे वेतनापेक्षा अधिक पैसे मिळवत असतील, तर त्याविषयी आई, पत्नी किंवा मुले त्यांना जाब विचारतांना कधी दिसत नाहीत. म्हणजेच प्रत्येक जण या भ्रष्टाचाराला ‘मम’ म्हणतांना दिसत आहे. अशा वेळी संस्कार आणि त्यांचे पालन कसे होणार ? आणि नैतिक आचरण कधी होणार ? राजकारणात असलेल्या लोकांची कोणतीही नोकरी आणि व्यवसाय नसतांना त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असते. हे कशामुळे होते ? हे भारतातील प्रत्येकाला ठाऊक आहे; पण त्यावर कारवाई कोण करणार ? हे प्रश्न आहेत.
साधना केल्यास यश !
कोणत्याही मंडळामध्ये, संघटनेमध्ये, पक्षामध्ये किंवा एखाद्या सरकारमध्ये १० पैकी ७ जण भ्रष्टाचारी असले, तरी २-३ जण हे प्रामाणिक असतात आणि ते सचोटीने वागण्याचा प्रयत्न करतात. वरील ७ पैकी काही जण निर्ढावलेले असतात, तर काही जण परिस्थितीमुळे तसे वागत असतात. म्हणजेच खर्या भ्रष्टाचार्यांची संख्या पाहिली, तर ती अल्प असली, तरी त्यांच्याकडे अधिकार आणि संघटितपणा असल्यामुळे ते नेहमीच वरचढ ठरत असतात. यालाच धक्का देण्याची आवश्यकता आहे. जर मुख्य व्यक्तीच, उदा. मंडळाचा अध्यक्ष, सरकारमधील प्रमुख जर प्रामाणिक असेल, तर तो प्रामाणिकपणे कार्य करू शकतो आणि करवून घेऊ शकतो. आज जनतेला वाटते की, पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. भ्रष्टाचार उघडही होत होता; मात्र सध्याच्या मोदी सरकारच्या काळात तरी कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. याचा अर्थ भ्रष्टाचार होत नसेल, असे म्हणणेही धाडसाचे ठरेल, हे जनतेलाही ठाऊक आहे. भारताला याच्या पुष्कळ पुढे न्यावे लागणार आहे. प्रत्येक क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त करावे लागणार आहे. आज भाजीवाला, किराणा दुकानदार आदी मापात पाप करतांना दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी त्यांच्या मावळ्यांना ‘शेतकर्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये’, असा आदेश दिला होता. याचाच अर्थ तेव्हाही भ्रष्टाचार चालूच होता, हे लक्षात घ्यायला हवे; मात्र महाराजांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला. कारण ते धर्माचरणी, न्यायप्रिय आणि विरक्त होते. असे शासनकर्ते आणण्यासाठी जनतेला संघर्षच करावा लागेल. तसा संघर्ष करण्याची शक्ती साधनेमुळेच मिळू शकते. साधना करणार्याला देवाचे साहाय्य मिळून तो यशस्वी होतो. भ्रष्टाचार खरेच नष्ट करायचा असेल, तर जनतेने साधनाच केली पाहिजे !
भ्रष्टाचार नष्ट करून देशाला पुढे न्यायचे असेल, तर जनतेने साधना करण्याला पर्याय नाही ! |