घरी नामजप करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने ‘कार्यालयात दुपारच्या जेवणाच्या सुटीत नामजप करावा’, अशी तळमळ असतांना देवाची अनुभवलेली कृपा !
१. घरी नामजप करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने कार्यालयातील एका खोलीत बसून दुपारच्या जेवणाच्या सुटीत नामजप करत असतांना तेथे ३ धर्मांध येणे, त्यांनी ‘प्रार्थना कशी करणार ?’, असे आपापसांत बोलणे अन् साधिकेने तेथे बसून ३० मिनिटे नामजप करणे
‘मला माझ्या कार्यालयीन व्यस्ततेमुळे घरी नामजप करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. मला सकाळी लवकरच्या ‘लोकल ट्रेन’ने जावे लागत असल्याने मी कार्यालयात एक घंटा लवकर पोचते. एकदा दुपारच्या जेवणाच्या सुटीत मी एका खोलीत बसून नामजप करत होते. तेव्हा तिथे कार्यालयात काम करणारे ३ धर्मांध आले. त्यांना प्रार्थना करण्यासाठी कार्यालयात वेगळी खोली दिली आहे; पण ‘ती ही खोली आहे’, हे मला ठाऊक नव्हते. मला तिथे बसून नामजप करतांना बघून ते तिघे जण आपापसांत बोलू लागले. त्यांच्यातील एक जण जोरजोरात बोलू लागला, ‘‘ही तर अडचण आहे. आता आपण प्रार्थना कशी करणार ?’’ मी काहीही न बोलता नामजप करत होते. माझा ३० मिनिटे नामजप होईपर्यंत ते दारातच उभे राहिले.
२. धर्मांधांनी ‘त्यांच्या प्रार्थनेच्या वेळात स्त्री समोर दिसू नये’, असे सांगणे
मी खोलीतून बाहेर जायला निघाल्यावर ते तिघे मला पुष्कळ अस्वस्थ दिसले. मी त्यांना विचारले, ‘‘काय झाले ? तुम्ही इथे का उभे आहात ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘आम्ही इथे प्रतिदिन आमची प्रार्थना करतो. आज तुमचा काही सण आहे का ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘नाही. मी कार्यालयात एक घंटा लवकर येते. मला घरी वेळ मिळत नाही; म्हणून मी इथे बसून प्रतिदिन नामजप करणार आहे. तुम्ही तुमची साधना करा. मी माझी साधना करते. मला काही अडचण नाही.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आम्ही प्रार्थना करत असतांना आमच्या बाजूला कोणी असू नये.’’ मग मी त्यांना विचारले, ‘‘तुमच्या प्रार्थनास्थळी कसे करता ? त्या वेळी तर बाजूला सर्व जण असतात.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आम्ही प्रार्थना करतांना कोणतीही स्त्री किंवा मुलगी यांच्यावर आमची दृष्टी पडू नये. आमची त्यांच्यावर तशी दृष्टी पडली, तर आमची प्रार्थना देवाला मान्य होत नाही.’’
३. श्रीकृष्णाला सूक्ष्मातून अडचण सांगणे, कार्यालयातील मुख्य अधिकार्यांनी नामजपाविषयी विचारल्यावर त्यांना अडचण सांगणे आणि त्यांनी नामजप करण्यासाठी वेगळी खोली उपलब्ध करून देणे
मी माझा नामजप झाल्यावर माझ्या कामाच्या जागेवर जातांना मनातून श्रीकृष्णाला विचारले, ‘देवा, आता मी कसे करू ? मला या खोलीत बसून नामजप करता आला नाही, तर माझा नामजप होणार नाही.’ मी आमच्या कार्यालयातील मुख्य अधिकार्यांच्या खोलीच्या बाहेरून जात असतांना त्यांनी मला विचारले, ‘‘काय झाले ? तुमचा नामजप झाला का ?’’ तेव्हा मी त्यांना घडलेले सर्व सांगितले आणि म्हणाले, ‘‘मी त्या खोलीत बसून नामजप केल्यास त्या लोकांना अडचण आहे. मला काही अडचण नाही. मला नामजप करायचा आहे. त्यांना अडचण असेल, तर मला नामजप करण्यासाठी दुसरी खोली द्यावी.’’ त्यानंतर मला नामजप करण्यासाठी कार्यालयातील एक खोली स्वच्छ करून मिळाली. मी त्या खोलीत बसून प्रतिदिन नामजप करते.
गुरुकृपेने मला स्थिर राहून मुख्य अधिकार्यांना स्थिती ठामपणे सांगता आली. ‘मला नामजप करता यावा’, यासाठी देवानेच मला साहाय्य केले.’
– एक साधिका, महाराष्ट्र. (१३.७.२०२२)
|