सिंधुदुर्ग : मळगाव घाटात कचरा टाकणार्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवणार
सावंतवाडी – सावंतवाडी-रेडी मार्गावरील मळगाव घाटात कचरा टाकणार्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, तसेच त्यांच्यावर कारवाई करणे सुलभ व्हावे, यासाठी घाटीत ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्याचा निर्णय मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. (प्राथमिक शाळेपासून परिसर स्वच्छता, पर्यावरण रक्षण आदी विषय शिकवले जातात, तसेच सध्या पर्यावरण रक्षणासाठी विविध स्तरांवर प्रबोधनही केले जात आहे. असे असतांना अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्यांना केवळ कर्तव्याची नव्हे, तर सर्वसामान्य दायित्वाचीही जाणीव नाही, असेच म्हणावे लागेल. अशा प्रकारे समाजविघातक कृती करणार्यांवर कठोरातील कठोर कारवाई झाल्यास पुढे असे करण्यास कुणी धजावणार नाही ! – संपादक) या बैठकीत समितीच्या अध्यक्षा तथा मळगावच्या सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सदस्य गजानन सातार्डेकर, गुरुनाथ गावकर, अशोक बुगडे, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
याविषयी सरपंच स्नेहल जामदार यांनी सांगितले की,
१. निसर्गसंपन्न मळगाव घाटीत सध्या अक्षरशः कचर्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. सावंतवाडी शहर, तसेच ग्रामीण भागातूनही ये-जा करणार्या वाहनांचे चालक घाटीत कचरा फेकून निघून जातात.
२. यात नेहमीच्या कचर्याबरोबरच फुटलेल्या काचा, लाकडाचे तुकडे, खिळे अशा धारदार वस्तू फेकल्या जातात. त्याचप्रमाणे शिल्लक राहिलेले दूषित अन्नपदार्थ, पोल्ट्रीवर कापलेल्या कोंबड्यांचे उरलेले दुर्गंधीयुक्त अवशेष हेदेखील प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून घाटीत टाकले जातात.
३. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला असून लवकरच या ठिकाणी वनविभागाच्या सहकार्याने ‘सोलार सीसीटीव्ही कॅमेरे’ बसण्यात येणार आहेत. चालत्या गाडीवरून कचर्याच्या पिशव्या फेकणार्या वाहनांचा क्रमांक कॅमेर्यात टिपला गेल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच संबंधित व्यक्तीकडून संपूर्ण परिसराची स्वच्छता करून घेण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकासर्वसाधारण कर्तव्याची आणि दायित्वाची जाणीवही नसणारी जनता असणे, हे महासत्ता होऊ पहाणार्या भारत देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल ! |