‘भेसळ’च्या कारवाईत ‘भेसळ’ नको !
कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे राज्यभरातून लाखो भाविक भक्तीपूर्ण दर्शनासाठी येतात. घरी परततांना भाविक आवर्जून प्रसाद म्हणून पेढ्याची खरेदी करतात. यंदाच्या कार्तिक यात्रेमध्ये पेढे विक्रेत्यांनी स्टार्चचा वापर केल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने १० विक्रेत्यांकडून ३०० किलो पेढे जप्त करून ते नष्ट केले. दिवाळीच्या काळातही सोलापूर येथे अन्न आणि औषध प्रशासनाने मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खवा जप्त केला होता. हिंदूंचे महत्त्वाचे सण किंवा यात्रा यांच्या वेळीच ही कारवाई होते; म्हणजेच ‘अन्न आणि औषध प्रशासन अशा मुहूर्तांच्या वेळीच जागे होते का ?’, असा प्रश्न सामान्यांना पडतो.
अशाच प्रकारे गुटखा बंदी असतांना त्याची विक्री, भेसळयुक्त मिठाईची विक्री होत असल्याच्या प्रकरणी प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. अशा प्रकरणांमध्ये कारवाई झाल्याने भेसळ करणार्यांचे प्रमाण उणावल्याचे कधी आढळत नाही. भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीमुळे गुन्हे नोंद झाले, तरी अन्न आणि औषध प्रशासन पुरावे सादर करण्यात अपयशी ठरते. त्यामुळे संबंधित आरोपी सहज सुटतात. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असूनही अनेक ठिकाणी तो मोठ्या प्रमाणात जप्त केला जातो. यावरूनच प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण होते. भेसळ होण्याची वारंवारता थांबत नसेल, तर अशा कुचकामी कारवायांचा काय उपयोग ? भेसळ करणार्याने ‘भेसळ करू कि नको ?’, असा १० वेळा विचार करायला हवा, अशी कायद्यात तरतूद असावी. भेसळजन्य पदार्थांमुळे नागरिकांच्या जिवाचा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासन करत असलेल्या कारवाईत ‘भेसळ’ नको, असेच जनतेला वाटते.
मिठाई सिद्ध करण्यासाठी विविध निकष निश्चित करून दिलेले असले, तरी सर्रास या निकषांची पायमल्ली करत ती सिद्ध होते. अनेक ठिकाणी फळे रसायनांमध्ये बुडवून विक्रीला ठेवली जातात. स्वत:ची फसवणूक रोखण्यासाठी आता जनतेनेच जागरूक राहून याविरोधात आवाज उठवायला हवा. सजग नागरिकांमध्ये ढिसाळ यंत्रणेत पालट घडवण्याची अलोट शक्ती असते. त्यामुळे नागरिकांनीही पुढाकार घेऊन याविषयीच्या तक्रारी प्रविष्ट कराव्यात, तसेच भेसळ करणार्यांवर कारवाई करण्यास यंत्रणेला भाग पाडावे, तरच ‘भेसळ’ पदार्थांवरील कारवाईत होणारी ‘भेसळ’ थांबेल.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर