‘हॅलोवीन’ची विकृती साजरी करणार्यांचा एका धर्मप्रेमीने केलेला सडेतोड प्रतिवाद !
एका शहरात एका इमारतीतील लहान मुले ‘हॅलोवीन’साठी भुतांसारखे तोंडवळे रंगवून ‘ट्रीक ऑर ट्रीट’ असे म्हणत ‘कँडीज्’ मागायला आली. त्यानंतर इमारतीच्या ‘व्हॉट्सॲप’च्या गटावर काही मुलांच्या मातांनी ‘अवर हॅलोवीन गँग, सो क्यूट’, असे लिहून त्या मुलांची छायाचित्रेही प्रसारित केली. त्या छायाचित्रांच्या खाली इमारतीतील एका ज्येष्ठ व्यक्तीने एक संदेश प्रसारित केला. त्यात पुढील उल्लेख होता.
‘गेल्या काही वर्षांत ‘हॅलोवीन’ नावाचा विदेशी बिनडोकपणा हिंदूंच्या घराघरात शिरत आहे. हाडके, घुबडे, फ्रँकस्तीन, भुते, हडळ आदींचे तोंडवळे, तसेच जळमटे, कोळी घरात लावायचे आणि म्हणायचे ‘हॅपी हॅलोविन !’
हिंदूंचा आनंदमय दीपोत्सव साजरा करतांना ‘घरातील अमंगल आणि दारिद्र्य बाहेर जावो अन् मंगलमय, लक्ष्मी सोनपावलांनी घरात येवो’, असे म्हणायचे अन् दिवाळीनंतर ‘हॅलोवीन’च्या मूर्खपणाच्या नावाने तीच घाण घरात परत आणायची ? आधी सर्वांगसुंदर सुख-समृद्धीचे प्रतीक म्हणून नवीन कपडे परिधान करून लक्ष्मीपूजन करायचे, पाडव्याच्या दिवशी मंदिरात जाऊन ‘अज्ञानत्व हरोनी बुद्धीमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंताक्लेश दरिद्र दु:ख अवघी देशांतरा पाठवी ।’, अशी प्रार्थना करायची आणि नंतर थोड्या दिवसांनी भुताखेतांचे वेश घालून हिंडायचे अन् त्यांना घरात घेऊन यायचे, ही कसली अवदसा आहे ?
बटू मुलांना मुंज केल्यावर दोन घरी भिक्षा मागायला जाण्याची लाज वाटते आणि हीच मुले भुतांसारखे तोंडवळे रंगवून घरोघरी चॉकलेट मात्र मागत फिरतात. ही कसली विकृती आपण साजरी करत आहोत ?
आपली मुले असे प्रकार करत असतील, तर त्यांचे कोडकौतुक करू नका. जे कुणी त्यांना असे करायला उद्युक्त करत असतील, त्यांना दम द्या. त्यांना आठवण करून द्या की, काही दिवसांपूर्वीच आपण हिंदु धर्मानुसार मंगलमय दिवाळी साजरी केली आहे. ‘पुन्हा जर असे प्रकार मुलांना करायला लावले, तर तुमच्या दारात श्राद्धाचा स्वयंपाक, मिरची-लिंबू, काळी बाहुली आणि पत्रावळीवर गुलाल घातलेला भात, असे आणून ठेवू’, अशीही चेतावणी द्या !’
(संदर्भ : संकेतस्थळ)