सत्संगाच्या वेळी आत्मविश्वास न्यून झाल्यावर सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाला भावार्चना करायला सुचवून त्याच्याकडून श्री गुरूंनीच धर्मप्रेमींना आवश्यक असणारा विषय मांडल्याचे लक्षात येणे
‘गावागावांमध्ये जाऊन धर्मप्रेमींसाठी बैठका घेणे, साधकांसाठी सत्संग आणि अभ्यासवर्ग घेणे’, अशा अनेक प्रकारच्या सेवा माझ्याकडे असतात.
१. एका गावात गेल्यावर काहीच सुचेनासे झाल्यावर सहसाधकाला ‘मला विषय घ्यायला जमणार नाही’, असे सांगण्याचा विचार मनात येणे
एकदा सोलापूर जिल्ह्यातील एका गावात मी साधकांचा सत्संग घेण्यासाठी गेलो होतो. सत्संगाला १० मिनिटे असतांना मला काहीच सुचेनासे झाले. माझा आत्मविश्वास न्यून झाला. ‘मी सत्संग घेऊ शकणार नाही’, अशी माझी स्थिती झाली. ‘माझ्या या स्थितीविषयी सहसाधकाला सांगूया’, असा विचार केला आणि मी एका जागी जाऊन शांतपणे बसलो.
२. सत्संगाच्या आधी आपोआप डोळे मिटले जाऊन भावार्चना होणे
काही क्षणांत माझ्याकडून आपोआप डोळे मिटले गेले. आरंभी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली. त्या वेळी माझ्याकडून झालेली भावार्चना पुढे दिली आहे.
अ. परात्पर गुरुदेव यांचे शेषशाही श्रीविष्णुरूप माझ्या सहस्रारावर विराजमान आहे.
आ. माझ्या आज्ञाचक्रावर श्री महाविष्णु विराजमान आहे.
इ. कानाच्या वरच्या भागात भगवान श्रीकृष्ण विराजमान आहे.
ई. डोक्याच्या मागे श्री सत्यनारायण परात्पर गुरुदेव यांचे रूप विराजमान आहे.
उ. डाव्या बाजूला कानाच्या वर श्रीरामाचे रूप परात्पर गुरुदेवांच्या वेशात विराजमान आहे.
ऊ. हृदयात वीर हनुमान विराजमान आहे.
त्या वेळी मला माझ्या शरिरावर देवतांचे अस्तित्व जाणवू लागले. त्यानंतर मी संपूर्ण शरिरावर सूक्ष्मातून ‘परम पूज्य डॉक्टर’, ‘परम पूज्य डॉक्टर’, असा नामजप लिहिला. हे सर्व माझ्याकडून आपोआप होत होते.
३. भावार्चनेनंतर स्वतःचे अस्तित्व न जाणवणे
भावार्चना झाल्यावर माझी स्थिती पूर्ववत् झाली आणि मला एकदम हलके वाटायला लागले. तेव्हा मला स्वतःच्या अस्तित्वाचीही जाणीव नव्हती.
४. परात्पर गुरुदेवच स्वतःच्या माध्यमातून सत्संगात बोलले असल्याचे सहसाधकांनी विषय छान झाल्याचे म्हटल्यावर लक्षात येणे
थोड्या वेळाने सत्संग चालू झाला. सत्संगाच्या वेळी मी ४५ मिनिटे बोललो. त्यानंतर सहसाधक मला म्हणाले, ‘‘विषय वेगळाच आणि छान झाला.’’ तेव्हा ‘देवानेच तो विषय घेतला’, हे माझ्या लक्षात आले आणि कृतज्ञता व्यक्त झाली. या भावप्रयोगातून कर्ता, करविता आणि करून घेणारे सर्वस्व परम पूज्य गुरुदेव आहेत. ‘साधकांनी नेहमी कृतज्ञताभावात राहूनच सर्व केले पाहिजे’, हे प्रत्यक्ष त्यांनी मला शिकवले.
५. भावार्चनेच्या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे
अ. माझा अहं वाढू नये; म्हणून परात्पर गुरुदेवांनी भावार्चनेच्या माध्यमातून माझा अहं नष्ट केला.
आ. परात्पर गुरुदेवांनी भावार्चनेच्या वेळी माझ्यात कृतज्ञताभाव निर्माण केला. त्यांनीच माझ्या माध्यमातून सत्संगाला उपस्थित असलेल्या धर्मप्रेमींचे प्रबोधन केले.
इ. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’च्या कार्यात गुरूंच्या चैतन्यमय वाणीतून धर्मप्रेमींना विषय समजू शकला. त्यामुळे ते या कार्यात जोडले गेले. ‘समोरच्या व्यक्तीची स्थिती कशी असते ? त्यांना विषय कसा सांगायला हवा ?’, हे परात्पर गुरुदेवांनाच कळू शकते.
ई. एकदा प.पू. अनंतानंद साईश प.पू. भक्तराज महाराज यांना म्हणाले, ‘‘आता तुझे दुकान चालणार कि माझे ?’’ शेवटी प.पू. भक्तराज महाराज यांचे औषधांचे दुकान बंद होऊन प.पू. अनंतानंद साईश यांचे अध्यात्माचे दुकान चालू राहिले. त्याप्रमाणे आता आपलेही तसेच आहे. सर्वकाही परात्पर गुरुदेव करणार आहेत. त्यात आपले काहीच चालणार नाही. ‘आपण केवळ आणि केवळ शरणागतभावात रहाणे आणि आपली साधना करणे’, एवढेच आपल्या हातात आहे.’
– श्री. निरंजन चोडणकर (वय ४८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), डिचोली, गोवा. (२८.६.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |