पर्यावरणप्रेमी कृतीशील नागरिकांमुळे नवी मुंबई स्वच्छतेत पुढे ! – संदीप नाईक, माजी आमदार
नवी मुंबई, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – पर्यावरणप्रेमी कृतीशील नागरिकांमुळे नवी मुंबई स्वच्छतेत पुढे आहे, असे प्रतिपादन ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक यांनी येथे केले. ते ‘मँग्रोव्हज मार्शल ग्रुप’च्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्यांचा सत्कार करतांना बोलत होते. या वेळी ग्रुपचे रोहित मल्होत्रा, तसेच सामाजिक कार्यकर्ते नीलेश भोजने, अंशु वर्धन आदींसह इतर सदस्य उपस्थित होते. ‘मँग्रोव्हज मार्शल ग्रुप’च्या वतीने काही मासांपासून शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. नुकताच वाशीचा खाडीकिनारा स्वच्छ करण्यात आला. ग्रुपची ही १०१ वी स्वच्छता मोहीम होती. यानिमित्त संदीप नाईक यांच्या हस्ते मोहिमेत सहभागी झालेल्या नवी मुंबईकरांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी संदीप नाईक म्हणाले की, खारफुटीच्या स्वच्छतेविषयी लोकांमध्ये जनजागृती झाली, तर आपण खर्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल राखू शकतो. रोहित मल्होत्रा यांनी मोहिमेमुळे पर्यावरणाची हानी रोखली जात असल्याचे सांगितले. खारफुटी रक्षणाच्या मोहिमेत जेव्हा सर्वजण एकत्र येतील, तेव्हा मोहिमेचे ध्येय पूर्ण होईल.