साधकांमध्ये व्यष्टी ते समष्टी प्रकृती इतका आमूलाग्र पालट करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !
‘श्री गुरूंच्या कृपेने मला अनेक वेळा रामनाथी येथे जाण्याची संधी मिळते. या काळात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना मी अनेक वेळा भेटले. तेव्हा मला त्यांच्याकडून अनेक सूत्रे शिकायला मिळाली. माझ्यात व्यष्टी ते समष्टी असा पालट केवळ आणि केवळ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामुळेच झाला आहे. त्या संदर्भात मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. प्रत्येकच सेवा परिपूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेला ‘व्यवस्थितपणा आणि इतरांचा विचार करून आढावा कसा द्यायचा ?’, हे शिकता येणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीत गेल्यावर त्यांचे सेवेविषयीचे सर्व कागद नेहमी व्यवस्थित ठेवलेले असतात. त्यांच्या लिखाणाच्या वहीतही वेगवेगळे विषय एका विशिष्ट पद्धतीने लिहिलेले असतात. हे पाहून ‘मला सेवांचा आढावा साधनेच्या दृष्टीने कसा द्यायचा ?’, हे लक्षात आले. दायित्व असणार्या साधकांना सेवांचा आढावा देतांना मी विषयानुसार सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागले. जे महत्त्वाचे आहे, ते ठळक आणि धारिकेच्या आरंभी ठेवणे, जे माहितीसाठी आहे, ते सर्वांत शेवटी ठेवणे. ‘जे प्राधान्याचे नाही, तिथे ‘वेळेनुसार वाचू शकता’, असे लिहिणे, असे सेवेतील अनेक बारकावे मला शिकता आले. यातून मला ‘सेवेतील परिपूर्णता आणि इतरांचा विचार करणे’ हे गुण आत्मसात करता आले.
२. ‘एका सेवेशी संबंधित सर्व सूत्रे दिनांकानुसार लिहून ठेवायला हवी’, हे शिकणे
त्यांनी एका सेवेशी संबंधित सर्व सूत्रे एकत्र करून ठेवली होती. ते पाहून मीही एक वेगळी वही केली. ज्या दिवशी ‘एखादे सूत्र त्यांना विचारायला हवे’, असे मला वाटत असे, त्या दिवशी मी ते सूत्र वहीत दिनांकानुसार लिहून ठेवण्यास आरंभ केला. त्यामुळे त्यांच्याकडे जातांना ‘एखादे सूत्र विचारायचे राहिले’, असे होत नाही किंवा मला सूत्र आठवण्यासाठी बुद्धीला ताणही द्यावा लागत नाही.
३. ‘सेवेचा वेळ कुठे वाया जात नाही ना ?’, याकडे गांभीर्याने लक्ष देता येणे
एकदा त्यांनी मला बोलावले होते. मी त्यांच्याकडे गेले, तेव्हा अन्य साधक त्यांच्याशी बोलत असल्याचे पाहून मी त्यांच्या कक्षाच्या बाहेर थांबले. त्यांनी मला आत बोलावून सांगितले, ‘‘तू बाहेर का थांबली आहेस ? मी तुला बोलावले होते, तर लगेच आत यायला पाहिजे होते.’’ यामध्ये ‘माझा वेळ वाया गेला’, हे त्यांनी माझ्या लक्षात आणून दिले. तेव्हा ‘मी माझ्या वेळेचा जितका विचार करत नाही, त्याहून अधिक माझ्या वेळेचा विचार त्या करतात’, असे माझ्या लक्षात आले. या प्रसंगानंतर माझा वेळेकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटला. पुन्हा अशी चूक न होण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले.
४. ‘भावनेच्या भरात कृती न करता अधिक योग्य विचार कसा करायला हवा ?’, हे शिकता येणे
एकदा मी रामनाथी आश्रमात असतांना त्यांनी मला अंतर्गत दूरभाष करण्यास सांगितले. त्यांच्या कक्षातील अंतर्गत दूरभाष व्यस्त लागल्यामुळे मी लगेचच त्यांना त्यांच्या कक्षात जाऊन भेटले. तेव्हा त्यांनी मला जाणीव करून दिली, ‘‘एखाद्या निरोपासाठी हातातील सेवा सोडून यायला नको. काही वेळ थांबून पुन्हा दूरभाष करू शकली असतीस. यामध्ये तुझा वेळ आणि शक्ती दोन्ही वाया गेली.’’ यामुळे मला ‘भावनेच्या भरात कृती न करता अधिक योग्य विचार कसा करायला हवा ?’, हे शिकता आले.
५. ‘प्रत्येक सूत्राचा पूर्ण अभ्यास करायला पाहिजे, त्यातून साधना होते’, हे शिकता येणे
एकदा एका सूत्राचा पूर्ण अभ्यास न करता मी त्यांना ते सूत्र सांगितले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘तुझी प्रत्येक सूत्राचा अभ्यास करण्याची क्षमता आहे; म्हणून तू नेहमी अभ्यास करूनच सूत्र सांगायला हवेस. आपण परिपूर्ण अभ्यास केला की, त्यातून आपली साधना होते आणि गुरुदेवांना तेच आवडते.’’ यातून ‘मी कुठे न्यून पडते ?’, हे त्यांनी अचूक ओळखले आणि मला पुढील दिशा दिली. त्यामुळेच मला प्रत्येक सूत्राचा सखोल अभ्यास करायची सवय लागली.’
– (पू.) कु. रत्नमाला दळवी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.८.२०२१)