राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपटनिर्मिती करणार !
सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे, अशी घोषणा राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ येथे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचार कृती संमेलना’च्या उद्घाटनप्रसंगी केली.
ते पुढे म्हणाले की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव नागपूर विद्यापिठाला देण्याविषयी मी केलेल्या संसदीय संघर्षाला यश मिळाले, याचा मला विशेष आनंद आणि अभिमान आहे. नागपूर विद्यापिठाला राष्ट्रसंतांचे नाव दिल्यानंतर गुरुकुंज मोझरी येथील आश्रमात राष्ट्रसंत बसायचे, त्या गादीवर बसण्याचे भाग्य मला लाभले, हा माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण होता. राष्ट्रसंतांनी स्थापन केलेल्या अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचा मी आज उपाध्यक्ष आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यांच्या बळावरच हे भाग्य मला लाभले आहे.